Thursday, June 5, 2008

पॅशन इंडिया - अनिता डेलगाडोची कहाणी

हल्लीच वाचलेल्या एका पुस्तकाचा आज परिचय करून देणार आहे. जॅवियेर मोरो हे लेखकाचे नाव. महाराजा ऑफ कपुर्थळा आणि एक स्पॅनिश तरुणी यांची कहाणी या पुस्तकात वर्णिली आहे. पहिल्या महायुद्धाच्या पूर्वीचा काळ ही त्या कथेची सुरवातीची पार्श्वभूमि आहे. पुस्तकाचे प्रकाशन वर्ष माझेपाशी लिहिलेले नाही पण पुस्तक फार जुने नसावे. पुस्तक फार उच्च दर्जाचे नाही. पुस्तकात जागजागी भारतातील स्वातंत्र्यचळवळीचे व पुढार्‍यांचे आलेले उल्लेख अचूक वाटले नाहीत. संस्थानी वातावरणाची वर्णने करमणूक करतात. त्यात अतिशयोक्तिहि पुष्कळ आहे.
कपुर्थळाचा हा राजा त्याच्या बालवयात सत्तेवर आला कारण त्याचा पिता वारला. त्याचे शिक्षण बर्‍यापैकी झाले. त्याला इंग्लिश व फ्रेन्च उत्तम येत होते. तो फारसा जुनाट विचारसरणीचा नव्हता पण अखेर एक संस्थानिक होता! त्याचे राज्य व घराणे मात्र जुन्या वळणाचे होते. कपुर्थळा हे पंजाबमधील संस्थान आकाराने लहानसेच होते त्यामुळे फार श्रीमंत नव्हते मात्र, राजाच्या वैयक्तिक मालकीची खूप जमीन पूर्व उत्तर-प्रदेशात होती. १८५७च्या युद्धात त्यावेळच्या कपुर्थळा संस्थानिकाने ब्रिटिशाना मदत केल्यामुळे सरकारने ही जमीन त्याला भेट दिली होती. तिच्या उत्पन्नामुळे स्व्त: राजा मात्र खूप धनवान होता! राजाचे तीन विवाह झालेले होते व त्याला तीन पुत्र होते. इतर राणीवसा मोठा होता.
राजा युरोपच्या सफरीवर असताना फ्रान्समध्ये त्याचा अनिता डेल्गाडो या एका स्पॅनिश तरुणीशी परिचय झाला. ती एक गरीब पण बर्‍या घराण्यातील अशिक्षित मुलगी होती. तिला स्पॅनिशही जेमतेम लिहिता वाचता येत होते. ती थोडेफार नृत्य शिकली होती एवढेच! दोघी बहिणी हॉटेलान नाचून संसार चालवण्यास वडिलाना मदत करत होत्या. हॉटेलात बहिणीबरोबर नाचताना ती राजाला दिसली व तो तिच्यासाठी पागलच झाला. हरप्रयत्नाने तिच्या वारंवार भेटी घेऊन व ’भेटी’ देऊन तिला वश करण्याचा त्याने प्रयत्न चालवला. दोघांच्या वयामध्ये खूप फरक होता. त्याने अनिताला अखेर मागणीच घातली! मात्र तिच्या आईवडिलांनी स्पष्ट अट घातली की राजाने स्पॅनिश कायद्यानुसार तिच्याशी लग्न (सिव्हिल मॅरेज) केले पाहिजे. राजाने ते मान्य केले. ती अशिक्षित असल्यामुळे काही काळ तिला पॅरिसमध्ये ठेवून राजाने तिच्या शिक्षणाची व श्रीमंताचे रीतिरिवाजहि शिकवण्याची व्यवस्था केली. नंतर तिला कपुर्थळाला आणले. युरोप व कपुर्थळा यांच्यात महदंतर होते. तिला राजाच्या इतर राण्यांची व कुटुंबाचीहि कल्पना नव्हती. राजाने तिच्यासाठी स्वतंत्र निवासस्थान बांधले. हळूहळू तिला प्रमुख राणी मानले जाऊ लागले. मात्र ब्रिटिश व्हाइसराय व सरकार यांनी तिला कधीहि कपुर्थळाची राणी म्हणून मान्यता दिली नाही व राजाची इच्छा असूनहि त्याला त्याबाबत काही करता आले नाही. पुस्तकात तिच्या भारतातील वास्तव्याचे व तिच्या व्यक्तिमत्वात झालेल्या बदलाचे खुलासेवार दीर्घ वर्णन आहे. राजकुमारी अमृतकौर ही कपुर्थळाच्या राजघराण्याच्या एका ख्रिस्ती झालेल्या शाखेत जन्मलेली. तिची व अनिता डेल्गादो हिची घनिष्ट मैत्री होती.
दुसर्‍या महायुद्धातहि राजाने व संस्थानाने ब्रिटिशांना सर्व मदत केली. स्वातंत्र्य मिळाल्यावर संस्थान विलीन होण्याला अर्थातच काही पर्याय नव्हताच.
राजा वयाने मोठा तेव्हा कालांतराने त्याचे अनिताकडून लक्ष उडाले. अखेर तो महाराजा! त्याचा एक पुत्र अनिताचा समवयस्क होता. अनिताचे व त्याचे प्रेमसंबंध जुळले व ते राजाच्या ध्यानी आल्यावर त्याने अनिताला सरळ घटस्फोट दिला व स्पेनला परत जाणे भाग पाडले. तिला पैसे, दागदागिने, वेळोवेळी मिळालेल्या भारी भेटवस्तू नेऊ दिल्या. भरपूर पेन्शनही दिली. मात्र भारतात परत यावयाचे नाही अशी स्पष्ट अट घातलेली होती. सरकारनेही तिला त्यानंतर भारतात येऊ दिले नाही. तरीहि राजा युरोपात गेला तर तिला भेटत असे व त्यांची मैत्री राजाच्या मृत्यूपर्यंत कायम राहिली. तिच्या आईवडिलांच्या मृत्यूच्या वेळी पहिला शोकसंदेश त्याचेकडूनच पाठवला गेला. एका अशिक्षित मुलीने नशिबाने मिळालेले राणीपद व वैभव दीर्घकाळ उपभोगले होते व स्वत:ची वैयक्तिक उन्नति साधली होती.
राजाने खरेतर अनिताच्या आईला आपल्या तीन राण्यांच्या संसाराची पूर्ण माहिती दिली होती व अनिताला सांगावयास सांगितले होते. पण गरिबीमुळे राजाने देऊ केलेल्या संपत्तीला भुलून तिने अनिताला अंधारात ठेवले होते. ही गोष्ट कालांतरानेच अनिताला कळली पण तेव्हा वेळ निघून गेली होती.

Saturday, May 31, 2008

जोन्सटाउनचा पूर - भाग २

पुस्तकातील पहिल्या दोन पानांचे फोटो पहिल्या भागात दिले होते. लेखाचा उरलेला भाग आता वाचावयास मिळेल. पहिल्या भागातील दुसरे पान पुन्हा वाचा म्हणजे तिसर्‍या पानाची नीट संगति लागेल. घटना व त्यावरील पुस्तक दोन्हीहि जुनी आहेत व मी वाचल्यालाहि बराच काळ लोटला. मात्र त्यातील मनुष्यस्वभावाचे दर्शन अजूनहि ताजेच म्हणावे लागेल. या कारणास्तव या जुन्या विषयावर लिहिले.



Friday, May 30, 2008

जोन्सटाउनचा पूर






आज माझ्या एका पुस्तकातील आणखी एका लेखाची पहिली दोन पाने प्रसिद्ध करीत आहे. या विषयावर आमच्या ज्येष्ठ नागरिक संघटनेत मी एक व्याख्यानहि दिले होते. (इतर कोणी बोलावल्यास पुन्हाहि देण्याची तयारी आहे!) लेखात प्रथमच म्हटल्याप्रमाणे पुस्तक वाचताना पानशेतच्या प्रलयाची आठवण येत होती.
उरलेली पाने भाग दोन मध्ये वाचावयास मिळतील.

Tuesday, May 27, 2008

एका शब्दकोषाची कथा भाग २












मागील भागामध्ये कोष बनवण्याची प्रक्रिया वर्णन केली होती. हे पुस्तक वाचेपर्यंत मला त्याची काहीहि कल्पना नव्हती. आपण शाळकरी वयापासून कोष वापरतो पण तो बनवण्यासाठी किती कष्ट व वेळ खर्च पडलेला असेल याची आपणाला कल्पना नसते. प्रोफेसर मुरे याची हकीगत मागील भाग १ मध्ये सुरू केली होती तेथून पुढे वाचावे. संदर्भ लागण्यासाठी आवश्यक तर भाग १ मधील दुसरे पान पुन्हा वाचून मग हा भाग वाचावा. हे पुस्तक अचानकच माझ्या हाती लागले होते. माझ्याप्रमाणेच आपणालाही ते आवडले असावे ही अपेक्षा आहे.

Saturday, May 24, 2008

एका शब्दकोषाची कथा - भाग १











प्रिय वाचक,
आज नवीन विषय सुरू करीत आहे. माझ्याच एका जुन्या लेखाचे हे पुन:प्रक्षेपण आहे. पूर्वी ट्रू-टाइप फॉन्ट मध्ये टाइप केलेला मजकूर पुन्हा युनिकोड मध्ये टाइप करण्याचे टाळण्यासाठी छापलेल्या लेखाच्या पानांचे फोटो वापरले आहेत. मजकूर वाचण्यासाठी अवश्य तर फोटोवर क्लिक करा म्हणजे मजकूर स्पष्ट वाचता येईल. माझे बरेचसे कष्ट वाचवण्यासाठी आपणास थोडे कष्ट देतो आहे याबद्दल क्षमा करावी ही विनंति. उरलेल्या हकीगतीसाठी पुढील भाग जरूर पहावा. धन्यवाद!

Thursday, May 22, 2008

महंमद पैगंबर

प्रेषित महंमद पैगंबर
लेखक : बार्नबी रॉजरसन
प्रकाशन वर्ष – २००३

हा एक उत्तम चरित्रग्रंथ आहे. लेखकाने इस्लाम, कुराण व पैगंबराबद्दल पूर्ण आदराने लिहिले आहे. लेखकाने महंमदापूर्वीपासून त्याच्या मृत्यूपर्यंतचा अरबस्तानचा इतिहास, महंमदाचा आयुष्यक्रम व इस्लामचा उदय व उत्कर्ष याबद्दल लिहिले आहे. महमदाचे चाळिशीपर्यंतचे साधेसुधे व्यक्तिमत्व, मूळचा निरक्षरपणा, व त्यानंतर साक्षात्कार झाल्यावरचे जीवन याचे ठसठशीत चित्रण केले आहे. इस्लामचा अरबस्तानातील प्रसार व विस्तार याची कथा वाचावयास मिळते. काही मुख्य माहितीची नोंद केली आहे. पुस्तक मुळातून जरूर वाचावे असे आहे.
१ इस्लामच्या उदयापूर्वी अरबस्तानातील लोक, जे मुख्यत्वेकरून टोळ्यांचे जीवन जगत होते, ते ज्यू, ख्रिस्ती वा आदिवासी धर्मांचे अनुयायी होते. अनेक दैवते उपासली जात असत. काबाची उपासना त्यात फार महत्वाची होती. तिला इस्लाममधे मानाचे स्थान दिले गेले. इतर लहान मोठी दैवते मात्र टाकून दिली गेली. महंमदाला अब्राहामपासूनच्या सर्व ज्यू व ख्रिस्ती प्रेषितांबद्दल अतिशय आदरभाव होता. मात्र तो स्वत:ला त्यांच्या परंपरेतला अखेरचा प्रेषित मानत असे व यापुढे दुसरा कोणी प्रेषित येणार नाही, मीच शेवटचा असे त्याचे सांगणे असे. सर्व मुसलमान यावर दृढ श्रद्धा ठेवतात.
२. इस्लामचे असे निक्षून सांगणे आहे कीं ईश्वर एकच आहे, अल्ला हे त्याचे नाव आहे व महंमद हा त्याचा प्रेषित आहे. आणखी काही नाही. प्रत्येक मुसलमानाने अल्लाची स्वत:च प्रार्थना करावयाची, कोणा मध्यस्थाची गरज नाही वा परवानगीहि नाही!
३. मुस्लिम सुरवातीला जेरुसलेमकडे तोंड करून प्रार्थना करीत. मक्केकडे तोंड करण्याची प्रथा मागाहून सुरू झाली.
४. महंमद हा कुरैशी जमातीच्या प्रमुखाचा नातू, मुलीचा मुलगा होता व त्याचा पिता वारला होता. जमातीचे पुढारीपण पुढे मामाकडे आले. या जमातीने इस्लामचा स्वीकार केला नव्हता मात्र महंमदाला आजोबांचा व नंतर मामाचा पाठिंबा होता त्यामुळे दीर्घकाळपर्यंत त्याला जमातीकडून धोका झाला नाही.
५. धार्मिक संघर्षामुळे मुस्लिमाना मक्केत राहणे धोक्याचे होऊ लागले तेव्हा महंमदाने मुस्लिमांना प्रथम अबिसिनियामध्ये पाठवले. हा देश खरेतर श्रद्धावंत ख्रिश्चनधर्मीयांचा होता, तरीहि त्यांना स्वीकारले गेले.
६. पुढे सर्वच मुस्लिमधर्मीयांना मक्का सोडून मदिनेला जाण्याची पाळी आली. मदिना हे एक उत्तर दिशेला ओऍसिसचे शहर होते. तेथे दुसऱ्या जमातीचे वर्चस्व होते व त्यातील बरेचसे ख्रिस्ती व ज्यू होते. मुहंमदालाहि आता कुरैशी जमातीकडून धोका होता. सर्व मुस्लिमांना मदिनेस पाठवून कुरैशींच्या ठरलेल्या हल्ल्याच्या आदल्या रात्री महंमद व अबूबकर जिवानिशी मक्केतून निसटून मदिनेला पोचले. या स्थलांतरालाच हिजरा वा हिजरी म्हणतात व इस्लामची कालगणना तेथून सुरू होते.
७. मदिनामध्ये इस्लामने मूळ धरले व हळूहळू संघर्ष करीतच, सर्व अरबस्तानभर महंमदाच्या हयातीतच इस्लामचा प्रसार झाला.
८. इस्लाम ब्रह्मचर्य पाळण्याला मुळीच महत्व देत नाही. उलट, मुस्लिमांनी सर्वसाधारण कौटुंबिक जीवन जगावे, दातृत्व भावना बाळगावी, नेमाने ठरलेल्या वेळीं अल्लाची श्रद्धेने प्रार्थना करावी, प्रार्थनेसाठी मुस्लिम व अल्ला यांचेमध्ये कोणी मध्यस्थ नाही, शुचिता पाळावी अशी इस्लामची शिकवण आहे.
९. महंमदाच्या स्वत:च्या काळात जबरदस्तीने इस्लामची दीक्षा दिली जात नव्हती.
१०. महंमदाने स्वत: अनेक विवाह केले मात्र मुस्लिम पुरुषांसाठी चार विवाहांची मर्यादा ठरवून दिली तीहि जे चौघीनाहि समान वागणूक देऊ शकतील त्यांच्यासाठीच!

Tuesday, May 20, 2008

भारताचा थोर गणिती श्रीनिवास रामानुजम - भाग ५

सर्व सन्मान व कीर्ति मिळवून पण आजारी अवस्थेत रामानुजम बोटीने भारतात परत आला. मुंबईला त्याच्या स्वागतासाठी आई व भाऊ होते पण कौटुंबिक कलहांमुळे त्याच्या पत्नीला कळवलेलेच नव्हते! ती माहेरीच राहात होती व नंतर ती भावाबरोबर घरी आली. रामानुजम मद्रासला व मग कुंभकोणमला गेला. त्या प्रांतातील मोठमोठ्या प्रसिद्ध डॉक्टरांची औषधयोजना चालू झाली. अनेक क्षेत्रातील थोर लोक येऊन भेटत होते व लागेल ती मदत करत होते. पत्नी त्याची सेवाशुश्रूषा मनापासून करत होती. सासवासुनांचे अजिबात पटत नव्हते व या आजारपणातहि त्यांची भांडणे अखंड चालू होतीं. अर्थातच रुग्णाला त्याचा त्रास होतच होता. डॉक्टरांचे असे स्पष्ट मत होते की मद्रासच्या दमट हवेत राहून सुधारणा होणार नाही. चांगल्या हवेच्या ठिकाणी राहून सर्व औषधोपचार काळजीपूर्वक केले पाहिजेत. रामानुजमच्या आईने याला नकार दिला व मुलगा माझ्याजवळच हवा असा हेका धरला. डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश येईना.
अशा परिस्थितीतहि रामानुजमचे संशोधनकाम चालूच होते. स्फुरणारे नवीन सिद्धान्त लिहून काढले जात होते. त्याने पानेच्यापाने भरून जात होती. पुरी सिद्धता लिहून ठेवण्यात रामानुजमला अजूनहि रस नव्हताच. अल्पशिक्षित अशा त्याच्या पत्नीने मात्र असे सर्व कागद काळजीपूर्वक जतन केले. नवऱ्याचे काम काहीहि कळत नव्हते पण त्याला जगात मोठा मान आहे एवढे तिला नक्की समजले होते. काही महिने असे गेले पण प्रकृति खालावतच जाऊन अखेर एप्रिल १९२० मध्ये रामानुजमच्या जीवनाचा दु:खद अंत झाला.
त्याच्या पश्चात त्याच्या कुटुंबाची वाताहतच झाली. पत्नीला थोडी पेन्शन मिळाली. शिवणकाम करून त्यात भर घालून तिने पुढे दीर्घ आयुष्य कष्टात घालवले. मूल नव्हतेच. मात्र उत्तर आयुष्यात तिने एक मुलगा दत्तक घेतला होता. रामानुजमच्या धाकट्या भावांचे थोडेफार शिक्षण झाले व नोकऱ्या करून त्यानी आईला सांभाळले. मद्रास युनिव्हर्सिटीने रामानुजमच्या अखेरच्या काळातील संशोधनाचे कागद त्याच्या पत्नीकडून थोडा मोबदला देऊन मिळवले व प्रसिद्ध केले. मात्र त्याची एखादी प्रतहि त्याच्या पत्नीला पतीची आठवण म्हणून दिली नाही. हे अखेरचे संशोधन जगभरच्या गणितज्ञाना मिळाले व पुढील कित्येक दशके त्या कागदांचा अभ्यास व त्याच्या प्रमेयांच्या सिद्धता तपासणे हे काम त्याना पुरले व कित्येकाना त्यातून डॉक्टरेट मिळाली!
रामानुजमचे चरित्र वाचून तो भारतीय असल्याचा अभिमान वाटतो पण त्याच्या अपमृत्यूमुळे मन विषण्ण होते. त्याचा सच्चा मित्र व मार्गदर्शक हार्डी याला रामानुजमबद्दल फार आदर व अभिमान होता. त्याच्या माहितीच्या नव्या-जुन्या, इंग्लिश वा युरोपियन अनेक गणितज्ञांपेक्षा तो रामानुजमची योग्यता जास्त मानी. समोर मांडलेला गणितातील सिद्धान्त कळणारे, तपासून पाहून बरोबर-चूक ठरवू शकणारे पुष्कळ मिळतील पण सर्वस्वी नवीन तत्त्व वा प्रमेय वा सिद्धांत सुचणारा वा स्फुरणारा रामानुजमसारखा फार विरळा असे तो म्हणे यांतच रामानुजमची सर्व थोरवी आली असे म्हणता येईल.

Monday, May 19, 2008

भारताचा थोर गणिती - श्रीनिवास रामानुजम - भाग ४

हार्डीने रामानुजमला सर्व प्रकारे मार्गदर्शन केले. गणितसंशोधनावरचे रामानुजमचे प्रबंध आता विख्यात जर्नल्समधून प्रसिद्ध होऊ लागले. त्याचे जुने काम व प्रचंड प्रमाणावरील नवीन कामहि गणितज्ञांपुढे मांडले जाऊ लागले. त्यावर चर्चा, वादविवाद, भेटीगाठी,सभा होऊ लागल्या. हार्डीच्या मनातील हेतु सफळ झाला. हार्डी हा रामानुजमचा नि:स्वार्थी मित्र व चाहता होता. गणितज्ञांच्या सभेपुढे रामानुजमच्या प्रमेयांवर हार्डी स्वत: चर्चात्मक प्रबंध सादर करी.
रामानुजमने इंग्लंडला येण्याचे ठरविले तेव्हा त्याने आईला वचन दिले होते कीं मला इंग्रजी पोषाख करावा लागेल, शेंडी काढावी लागेल, केस राखावे लागतील पण मी शाकाहार सोडणार नाही. ते वचन त्याने खाण्याचे फार हाल होऊनहि कधी मोडले नाही. मद्रासी पद्धतीचे शाकाहारी जेवण जसे जमेल तसे, मुळात सवय मुळीच नसूनहि, त्याला स्वत:लाच बनवावे लागे. पहिली दोन वर्षे साधारण बरी गेली पण नंतर पहिले महायुद्ध सुरू झाले व मग सर्वच वस्तूंची भीषण टंचाई वाढत गेली व हाल होऊ लागले. दोन वर्षांनंतर त्याला शिष्यवृत्ति वाढवून मिळाली. मात्र युद्ध सुरू असल्यामुळे भारतात परत येणे शक्य नव्हते. केंब्रिजमध्येहि खूप बदल झाले. विद्यार्थी व अध्यापकही सैन्यात भरती होऊ लागले. नवीन विद्यार्थी कमी झाले. कॉलेजच्या आवारातच एक हॉस्पिटल सुरू झाले. जखमी सैनिक तेथे मोठ्या प्रमाणावर येऊ लागले. बॉंबहल्ले नव्हते पण वातावरण पूर्ण युद्धमय झाले.. खाण्याचे हाल, अति थंडी, गणितप्रेमी सोडले तर इतर इग्रज समाजाची नैसर्गिक अलिप्तवृत्ति व त्यामुळे एकलकोंडेपणा, भारतातून येणाऱ्या पत्रातून, सासूसुनांची भांडणे व कटकटींच्याच बातम्या, या सर्वांच्या परिणामी रामानुजमची प्रकृति वरचेवर बिघडू लागली. सर्दी, खोकला, ताप या चक्रात तो सापडला. हार्डीने त्याच्या औषधपाण्याची सोय केली पण खाण्याचे हाल निवारत नव्हते. हळूहळू दुखणे बळावत जाऊन क्षयावर गेले. हॉस्पिटलमध्ये काही महिने गेले. तेव्हा इंग्लंडमध्येहि क्षयावर फारसे उपचार उपलब्ध नव्हते. पौष्टिक खाण्याअभावी सुधारणा होत नव्हती. हार्डी वरचेवर भेटत असे. थोडें बरे वाटून रामानुजम बाहेर आला. प्रकृति सुधारत नव्हतीच.
केंब्रिज विद्यापीठाने रामानुजमला, अपवाद करून, कोणत्याही परीक्षेविना बी. ए. ची पदवी पूर्वीच दिली होती. नंतर एम. ए. हि दिली. केंब्रिजने त्याला फेलोशिप द्यावी अशी हार्डीची खटपट होती पण जमले नव्हते. हार्डी स्वत: रॉयल सोसायटीचा फेलो होता. इंग्लंडमधला तो सर्वोच्च सन्मान होता. हार्डीने रॉयल सोसायटीला आग्रहाने सुचवले की रामानुजमला फेलो म्हणून स्वीकृत करावे. १९१८ मध्ये त्याच्या खटपटीला यश येऊन रामानुजमला विद्येच्या क्षेत्रातील इंग्लंडमधील सर्वोच्च सन्मान, फेलो ऑफ द रॉयल सोसायटी, हा मिळाला! न्यूटनसारख्यांच्या पंक्तीत तो जाऊन बसला! त्यानंतर केम्ब्रिज बिद्यापीठानेहि त्याला फेलोशिप दिली. एव्हाना युद्ध संपले होते. एकूण परिस्थिती पाहून, रामानुजमने भारतात परत जावे व प्रकृति सुधारल्यावर परत केंब्रिजला यावे असे हार्डीने सुचवले. आता पैशांचा प्रश्न नव्हता. मद्रास युनिव्हर्सिटीने त्याला वार्षिक २५० पौंडांची भरघोस शिष्यवृत्ति दिली होती. रामानुजम एवढा निरपेक्ष की त्याने मद्रासला कळवले की मला एवढ्या पैशांची गरजच नाही. माझा व कुटुंबाचा खर्च भागून उरणारी रक्कम इतर गरजू विद्यार्थ्याना द्या! अशा प्रकारे सर्व सन्मान मिळवून पण गंभीर आजारी अवस्थेत रामानुजम भारतात परत आला. पुढील दु:खद हकीगत पुढील भागात.

Wednesday, May 14, 2008

भारताचा थोर गणिती - श्रीनिवास रामानुजम - भाग ३

काही मित्रांच्या सल्ल्याने त्याने ठरवले कीं आपले काम गणितातील परदेशी तज्ञांच्या नजरेला आणावे. त्यासाठी त्याने केंब्रिज मधील तीन थोर गणितज्ञांना पत्र लिहून आपल्या कामाची विस्तृत माहिती कळवली व मार्गदर्शनाची विनंति केली. दोघांनी काही दखल घेतली नाही. मात्र सुदैवाने तिसऱ्या, हार्डी नावाच्या विख्यात गणितज्ञाने त्याच्या पत्राची दखल घेतली. प्रथम त्यालाही, भारतातील मद्रास पोर्ट ट्रस्ट मध्ये कारकुनी करणाऱ्या व फक्त शाळा शिकलेल्या माणसाने गणितातील नवीन प्रमेये शोधल्याचा दावा करावा हे हास्यास्पदच वाटले होते व त्याने पत्र बाजूलाच ठेवून दिले होते. मात्र पत्राला जोडलेल्या पानांतून लिहिलेल्या प्रमेयांची त्याच्या अंतर्मनाने दखल घेतली असावी. कारण पत्राचा विचार त्याची पाठ सोडीना! हार्डी हा जगप्रसिद्ध गणितज्ञ, शिक्षकी पेशाच्या आईबापांचा मुलगा, मध्यमवर्गीय, क्रिकेटची आवड असणारा, अंतर्बाह्य ब्रिटिश, केंब्रिज विद्यापीठाचा फेलो, अशा व्यक्तिमत्वाचा होता. रामानुजमच्या पत्रात त्याला त्याच्या असामान्य प्रतिभेच्या खुणा दिसत होत्या. त्याने त्याचे वजन वापरण्याचे ठरवले. ब्रिटिश सरकारचे इंडिया ऑफिस, मद्रासचा गव्हर्नर, मद्रास युनिव्हर्सिटी या सर्व ठिकाणी त्याने रामानुजमला मद्रास युनिव्हर्सिटीने शिष्यवृत्ति द्यावी यासाठी आग्रह चालवला. युनिव्हर्सिटीला प्रश्न पडला कीं शाळेच्या पुढे न शिकलेल्या व्यक्तीला संशोधन शिष्यवृत्ति कशी काय द्यावी? पण हार्डी साहेब आग्रह धरतो आहे त्याला नाही कसे म्हणावे? व्हाइस चॅन्सेलरने अखेर दाखवून दिले कीं संशोधनाला उत्तेजन देणे हे घटनेप्रमाणे आपले काम आहे व हा इसम या कामाला योग्य आहे असे खुद्द हार्डीसाहेब म्हणतो आहे तेहा शंका घेणारे आपण कोण? अखेर युनिव्हर्सिटीने रामानुजमला महिना ७५ रुपयांची शिष्यवृत्ति मंजूर केली. आतां गणिताला सर्व वेळ देण्यास रामानुजम पूर्ण मोकळा झाला.
एवढ्याने हार्डीसाहेबाचे बिलकुल समाधान झाले नाही. त्याची खात्री पटली होती कीं रामानुजम केंब्रिजला आला तरच त्याच्या प्रतिभेला खरा न्याय मिळेल. त्याने लिहून कळवलेली अनेक प्रमेये खरी वाटत होतीं पण त्यांची पायरीपायरीने सिद्धता पद्धतशीरपणे सिद्ध करून दाखवल्याशिवाय त्याना वा रामानुजमला गणिताच्या जगात मान्यता मिळणार नव्हती. रामानुजमला याची आवश्यकता समजत नव्हती! तसेच मद्रासच्या डबक्यातून बाहेर पडून तो केंब्रिजच्या समुद्रात उतरल्याशिवाय त्याच्या प्रतिभेला खरा बहर येणार नव्हता. आपण रामानुजमच्या बरोबर एकत्र बसून गणितसंशोधन करावे अशी त्याला आच लागली होती. म्हणून त्याने रामनुजमला निरोप पाठवला कीं तूं केंब्रिजला ये! ज्या भारतीय गणितज्ञाकडे हा निरोप आला त्याने परभारेच उत्तर पाठवले कीं धर्मबंधनामुळे समुद्र ओलांडून रामानुजम केंब्रिजला येऊ शकणार नाही. हार्डीने विषय सोडून दिला नाही. त्याचा नॅव्हिल नावाचा मित्र मद्रासला गणितावर व्याख्याने देण्यासाठी येणार होता त्याच्याकडे त्याने रामानुजमला समजावण्याची कामगिरी दिली. त्याच्या भेटीनंतर रामानुजमने केम्ब्रिजला येण्याचे मान्य केले.! कुलस्वामिनीच्या दर्शनाला जाऊन, तिचा मला साक्षात्कार झाला आहे असे आईला समजावले. मोठमोठे लोक आपल्या मुलाला मानतात व कॉलेजात नापास झालेल्या आपल्या मुलाला खास शिष्यवृत्ति मिळते याचा कोठेतरी तिच्या मनावर ठसा उमटला असावा. तिने मान्य केले.
केंब्रिजला जावयाचे तर खर्चाचे काय हा प्रश्न होताच. हार्डी व त्याचा एक मित्र लिटलवुड यांनी व्यक्तिश: वर्षाला पन्नास पौंड खर्च करण्याची तयारी ठेवली होती. पण तेवढ्याने काहीच भागणार नव्हते. इंडिया ऑफिसने हात झटकले मात्र मद्रास युनिव्हर्सिटीने प्रवासखर्च व दोन वर्षांच्या खर्चासाठी ६०० पौंड एवढी भरघोस मदत दिली. त्यामुळे प्रश्न सुटला! १९१३ च्या मार्चमध्ये रामानुजम बोटीने केंब्रिजला रवाना झाला. ट्रिनिटी कॉलेजने त्याला हॉस्टेलला रहावयास जागा दिली व युनिव्हर्सिटीच्या ग्रंथालयाची कवाडे त्याला खुली झाली! प्रोफेसर हार्डीने त्याला आपल्या पंखाखाली घेतले. रामानुजमच्या प्रतिभेचा रथ आता चौखूर उधळू लागला!

Sunday, May 11, 2008

भारताचा थोर गणिती - श्रीनिवास रामानुजम - भाग २

रामानुजम हा कुंभकोणम शहरातील एका गरीब वैष्णव अय्यंगार ब्राह्मण कुळातला पहिला मुलगा. पाठची काही भावंडे अल्प वयात वारली. दोन भाऊ जगले ते त्याच्यापेक्षा खूप लहान. बालवयात देवी आल्या व चेहेऱ्यावर खुणा ठेवून गेल्या. शरीरप्रकृति साधारण, खेळांमध्ये रुचि नाही. अभ्यासातील हुशारी मात्र बालवयातच दिसून येई. अंकगणितात आपल्यापेक्षा कोणाला जास्त मार्क मिळाले तर त्याला राग येई! इतर विद्यार्थ्याना शिकवणे त्याला आवडे. शालेय शिक्षण संपेपर्यंत त्याची प्रगति उत्तमच होती व त्यामुळे त्याला कॉलेज शिक्षणासाठी शिष्यवृत्ति मिळाली. त्याच्या स्वत:च्या किंवा मातुल कुळात उच्च बौद्धिक कामगिरीची कोणतीहि परंपरा नव्हती. ब्राह्मणकुळात जन्म एवढाच वारसा होता. वडील नगण्य व घरात आईचा वरचष्मा होता. घरातील वातावरण सर्व आचारधर्म निष्ठेने पाळणारे होते व त्याचीहि मनोवृत्ति तशीच होती. शाळकरी वयापासून त्याचे गणिताचे आकलन व आकर्षण असामान्य होते. त्याच्या घरात भाडेकरू असलेल्या काही कॉलेज विद्यार्थ्यानी जी. एस. कार नावाच्या लेखकाच्या एका गणिताच्या पुस्तकाशी त्याचा परिचय करून दिला. त्याच्या वयाच्या मानाने ते फारच पुढचे होते. त्याचा रामानुजमच्या आयुष्यावर फार परिणाम झाला. ५००० निरनिराळी प्रमेये, फॉर्म्युले, इक्वेशन्स यांचा हा हा एक संग्रह होता. आल्जिब्रा, जॉमेट्री, ट्रिगॉनॉमेट्री, डिफरन्शिअल इक्वेशन्स अशा अनेक विषयांचा त्यांत समावेश होता. फॉर्म्युले दिले होते पण त्यांच्या सिद्धता दिलेल्या नव्हत्या. हे पुस्तक काही विशिष्ट हेतूने बनवलेले होते. केंब्रिज विद्यापीठाची गणित विषयाची ट्रायपॉस ही परीक्षा तेव्हां फार गाजलेली होती. केंब्रिजचे हुशार विद्यार्थी या परीक्षेला बसत. प्रथम वर्गात पास होणाराना रॅंग्लर ही पदवी मिळे. प्रथम क्रमांकाला सीनियर रॅंग्लर म्हणत. कित्येक भारतीय या परीक्षेला बसत. महाराष्ट्रातील महाजनी व परांजपे ही नावे आठवतील. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक होते. परीक्षा पास होणारा विद्यार्थी विषेश बुद्धिमान समजला जाई व पुढील आयुष्यात हमखास चमकत असे मात्र तो असामान्य गणिती वा गणितसंशोधक हॊईलच असे नसे! उलट, कित्येक असामान्य गणितज्ञाना ही परीक्षा जड जाई!
शाळकरी वयापासून या पुस्तकाने व गणित या एकाच विषयाने रामानुजमला झपाटून ताकलेले होते. कॉलेजमध्ये गेल्यावर इतर कोणत्याच विषयात त्याला रस वाटेना. परिणामी शिष्यवृत्ति मिळवणारा हा विद्यार्थी कॉलेजात चक्क नापास होऊ लागला. इंग्लिश बऱ्यापैकी येत असूनहि त्याही विषयात नापास! एक दोन वर्षे असे चालून अखेर शिष्यवृति बंद झाली व गरिबीमुळे कॉलेज सोडून घरी बसावे लागले. शिक्षण संपले पण गणिताचा अभ्यास चालूच होता. नोकरी शोधावी तर शिक्षण अर्धवट त्यामुळे काही जमेना. किरकोळ कामे करणे व गणित शिकवणे यावर कसेबसे चालले होते. गणित शिकवणेहि साधारन विद्यार्थ्याच्या डोक्यावरून जाणारे. गणितातला तज्ञ अशी त्याची कीर्ति झाली होती व त्या विषयात रस असलेल्या अनेकांशी मैत्री झाली होती. गणिताचा अभ्यास जोरात चालू होता व नवनवीन मूलगामी तत्वे, फॉर्म्युले, प्रमेये त्याला सुचत होती व स्फुरत होतीं. त्याच्या वह्या भरून जात होत्या. मात्र कोणत्याही प्रमेयाची सिद्धता तो पायरीपायरीने लिहीत नव्हता, ते बरोबर आहेच असा त्याचा ठाम विश्वास असे! त्याला कोणी डिग्री देणार नव्हते याची त्याला पर्वा नव्हती पण आपले काम कोणातरी विद्वानाने पहावे, चर्चा करता यावी यासाठी तो आसुसला होता. भारतात हे कसे जमावे हे कळत नव्हते. पोटाचा प्रष्न होताच. प्रथेप्रमाणे बालवयातच लग्न झालेले होते. पत्नी खूप लहान व अजून माहेरीच होती. मित्रांच्या मध्यस्थीने त्याचे काही संशोधन भारतीय गणित संस्थेच्या प्रकाशनात छापले गेले होते एवढेच! रामचंद्रराव नावाच्या एका मित्राने एक वर्ष त्याचा खर्च चालवला. अखेर त्याची लायकी ओळखणाऱ्या कही वजनदार मित्रांच्या मध्यस्थीने त्याला मद्रास पोर्ट ट्रस्ट मध्ये कनिष्ठ कारकुनाची नोकरी लागली व पोटाचा प्रष्ण काहीसा सुटला. मोकळा वेळहि मिळू लागला कारण त्याने झटून काम करावे अशी कोणाची अपेक्षा नव्हतीच. नोकरी मिळाल्यावर पत्नी घरी आली व संसार कसाबसा सुरू झाला. सासूसुनेचे पटत नव्हते व सासू सुनेचा प्रथेप्रमाणे छळ करत होती. शिक्षण अर्धवट राहिल्यामुळे कार च्या जुन्या झालेल्या पुस्तकाच्या नंतरच्या गणित विषयातील नवीन घडामोडी त्याला अज्ञात होत्या. मात्र त्याची प्रतिभा स्वयंभू होती व इतरांनी शोधलेली कित्येक प्रमेये त्याला स्वतंत्रपणे सुचली होती व त्याच्या वहीत सिद्धतेशिवाय लिहिलेली होती. पण एक प्रकारे त्याची प्रगति खुंटली होती व पुढचा मार्ग दिसत नव्हता. तो कसा खुला झाला हे पुढील भागात पाहूं.

Sunday, May 4, 2008

भारताचा थोर गणिती - श्रीनिवास रामानुजम

रॉबर्ट कानिगेल नावाच्या लेखकाने १९९१ साली लिहिलेल्या रामानुजमच्या चरित्रावर हा लेख आधारलेला आहे. भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजम याचे नाव सर्व भारतीयांना माहीत असते पण त्याचा काळ आता मागे पडल्यामुळे व गणित विषयातील त्याची असामान्य कामगिरी सामान्य सुशिक्षिताच्या परिचयाची नसल्यामुळे त्याच्याबद्दल आपणाला फारशी माहिती नसते. रामानुजमच्या मृत्यूनंतर ७० वर्षानी एका अमेरिकन अभ्यासकाला त्याचे विस्तृत चरित्र लिहावेसे वातले यातच त्याची थोरवी उघड होते. त्याने हे चरित्र खूप संशोधन करून माहितीपूर्ण असे लिहिले आहेच पण त्याबरोबर त्याच्या गणिततील कामगिरीचाही चांगला परिचय करून दिला आहे हे विशेष. लेखकाने रामानुजम चा बालपणाचा व तारुण्याचा काल, तेव्हाचे भारताच्या दक्षिण भागातील शैक्षणिक व सामाजिक वातावरण, त्याचे केंब्रिजमधील आयुष्य, त्याची गणितातील अद्वितीय कामगिरी या सर्वांचे माहितीपूर्ण व वास्तव चित्रण केले आहे. रामानुजम् च्या गणितसंशोधनाने अभ्यासकांना घातलेली भुरळ त्यच्या पश्चातहि दीर्घकाळ टिकली व त्याचीं प्रमेये अभ्यासण्याचे काम विद्वानांना अनेक दशके पुरले! त्याच्या अल्प आयुष्यात चर्चिल्या गेलेल्या त्याच्या प्रमेयांपेक्षां कितीतरी अधिक फॉर्म्युले व इक्वेशने त्याने आयुष्याच्या अखेरच्या वर्षात लिहून ठेवली व तीं नंतर उजेडात आली! हे पुस्तक इतके विस्तृत व माहितीने परिपूर्ण आहे की त्याचा परामर्ष थोडक्यात घेता येणार नाही. रामानुजम च्या ऐन तारुण्यात झालेल्या निधनामुळे मात्र मन विषण्ण होते. रामानुजमवे जीवन व गणितातील थोर कार्य याचा अल्प परिचय या पुस्तकाच्या आधारे करून देणार आहे.

Saturday, April 12, 2008

अयोध्या विवाद

अयोध्या विवाद – लेखक श्री. शेखर सोनाळकर
बाबरी मशीद पाडली गेल्यानंतर हे पुस्तक प्रसिद्ध झाले. हा विषय तसा वादग्रस्त आहे. लेखकाने खूप मेहेनतीने अनेक पुस्तकांचा उत्खनन अहवालांचा ऐतिहासिक संदर्भांचा तपशीलवार अभ्यास केलेला दिसून येतो. पूर्वी अस्तित्वात असलेले राममंदिर उध्वस्त करून बाबराने ही मशीद बांधली होती काय याबद्दल लेखकाने मत दिले आहे की मशिदीच्या जागी आधी मंदिर असल्याचा पुरावा मिळालेला नाही. हे मत पटणे वा न पटणे व्यक्तिगत राहील. या जागी रामाचे जन्मस्थळ होते काय हा तर श्रद्धेचा भाग आहे. पण मंदिर पाडून मशीद बांधली गेली काय हा वस्तुनिष्ठ पुराव्यांचा विषय आहे. लेखकाने मांडलेले मुद्दे निकोप मनाने विचारात घेण्यास हरकत नसावी. या विचाराने पुस्तकातील काही माहिती आपणासमोर मांडली आहे.
१ रामायणाच्या उत्तरकांडातील एका उल्लेखाप्रमाणे अयोध्येपाशी शरयू नदी पश्चिमवाहिनी होती. प्रत्यक्षात ती तेथे उत्तरेला व मग वळण घेऊन पूर्वेला जाते. नेपाळातील शरयूचा काही भाग पश्चिमवाही आहे. मग रामायणकाळी अयोध्या नेपाळात होती काय?
२. बाबर प्रत्यक्षात अयोध्येपर्यंत आला होता काय याबद्दल शंकेला जागा आहे. बाबरनामा मुळात तुर्की भाषेत लिहिलेला होता. त्याच्या भाषांतरावरून इंग्रजीत भाषांतरे झाली. भारताच्या पूर्व भागात अफगाणांची सत्ता होती. त्याच्यावर बाबर चालून आला. या युद्धाच्या कालखंडातील बाबरनाम्यातील काही पाने गहाळ आहेत. मात्र एका इंग्रज महिलेने मूळ तुर्की ग्रंथ वाचून असे मत दिलेले आहे की बाबराचा तळ अयोध्येपासून ७०-८० मैलांवर ’अवध राज्याच्या सीमेवर’ पडला होता. अफगाणांशी युद्ध तेथेच झाले व पावसाळा आल्यामुळे बाबर तेथूनच आग्र्याला परत गेला. अयोध्येपर्यंत आलाच नाही.
२ मशिदीवरील ज्या शिलालेखांवरून बाबराने ही मशीद बांधली अशी समजूत होती ते शिलालेख खूप नंतरचे होते. त्यांच्यांत औरंबजेबाचा उल्लेख आहे व भाषा, वळण बाबरकालीन नाही.
४. बाबरी मशिदीचे बांधकाम ’जौनपूर’ पद्धतीचे आहे (होते). या प्रकारच्या अनेक मशिदी बाबरापूर्वी अफगाण अमलात त्या भागात बांधलेल्या होत्या. त्यातीलच ही एक.
५. मशिदीच्या भिंतीत काही दगडी खांब होते ते मुसलमानी वळणाचे नव्हते. पण ते फक्त सहा फूट उंच व भिंतीत नुसतेच बसवलेले होते.त्यांच्यावर भिंतीचे वा छ्ताचे वजन नव्हते. सहा फुटी खांब ’भव्य’ मंदिराचे अवशेष म्हणणे सयुक्तिक नाही.
६. मशिदीभोवती ब्रिटिश काळात भिंत बांधली गेली. तिच्या बाहेर एक चबुतरा रामजन्मस्थळ म्हणून मानला जात असे. हा श्रद्धेचा भाग खरा पण रामाचा जन्म अयोध्येत कौसल्येच्या म्हणून म्हटल्या जाणाऱ्या महालापासून खूप दूर या चबुतऱ्याच्या जागी कां झाला असेल?
हे काही मुद्दे वानगीदाखल दिले आहेत. उत्सुकता असणारानी मूळ पुस्तक वाचावे. बाबरी मशीद आता पाडली गेली आहे. त्या सर्व जागेचे ’पद्धतशीर’ उत्खनन कधी काळी झाले तर तेथे पूर्वी विक्रमादित्याने बांधलेले भव्य राममंदिर होते काय याचा उलगडा होऊ शकेल. मात्र कित्येक वर्षे हे होणे शक्य दिसत नाही. तेव्हा हा विषय संपलेला आहे.

Monday, April 7, 2008

विविध कॅलेंडरे भाग - २

५ मुसलमानांची कालगणना चांद्रवर्षानुरूप होते. वर्षाचे बारा चांद्रमास असतात व त्याना नावे आहेत. महिने शुक्ल प्रतिपदेला सुरू होतात. हिंदु-ज्यू कालगणनेपेक्षा मुख्य व महत्वाचा फरक म्हणजे सौरवर्ष व चांद्रवर्ष यांतील सुमारे ११ दिवसांचा फरक जुळवून घेण्यासाठी अधिक महिना वा इतर काही व्यवस्था नाही. बारा चांद्र महिने संपले की नवीन वर्ष सुरू! त्यामुळे वर्षारंभ व इतर सण वा उपासना दिवस दर वर्षी मागेमागे येतात. दर ३३ वर्षानी गाडी पुन्हा मूळपदावर येते. इस्लामच्या उदयापूर्वी अरबस्तानात ज्यूंची कालगणनाच होती. तेव्हाचे प्रचारातील आदिवासी वा ज्यू सणवार ऋतुचक्राशी निगडित होते. असे वाचनात आले की या सणांचा इस्लाम धर्मीयांवर पगडा राहू नये यासाठी महंमद पैगंबराने अधिकमासाची पद्धत जाणीवपूर्वकच बंद केली. त्यामुळे जुने सणवार लोक विसरले. हिजरी सन व इसवी सन याचे एकास एक असे नाते राहत नसल्यामुळे इतिहास संशोधकाना त्याची कोष्टके बनवून काळजीपूर्वक वापरावी लागतात!
६. आज जगात मुख्यत्वे वापरात असलेले कॅलेंडर म्हणजे इसवी सन. ख्रिस्तजन्मापासून याची सुरवात मानली जाते पण त्याची खात्री देता येत नाही. ही कालगणना पूर्णपणे सौरवर्षाची आहे. महिन्यांचाहि चंद्राशी काही संबंध नाही. वर्षाचे ३६५ दिवस बारा महिन्यांमध्ये कमीजास्त वाटलेले आहेत. मात्र ३-३ महिन्यांत ते साधारण सारखे आहेत. प्रत्यक्षात ही कालगणना ज्युलियस सीझरने ख्रिस्तापूर्वी ४५ वर्षे आधी सुरू केली तेव्हा त्याला ज्युलियन कॅलेंडर नाव होते. वर्षाचे ३६५ दिवस होते. लीप इयरचीहि पद्धत होती मात्र लीप इयर दर तीन वर्षानी घेतले जाई. इ. स. ३६ पर्यंत यामुळे जादा दिवस मोजले गेल्याचे स्पष्ट झाले. तेव्हा रोमन राजा ऑगस्टस याने ती दुरुस्त केली, जादा मोजलेले दिवस गाळले व लीप इयर ४ वर्षानी येऊ लागले. मात्र १००, २००, ३०० ही वर्षेहि लीप इयर मोजली गेल्यामुळे इ. स. १५८२ पर्यंत दहा दिवस जादा मोजले गेले होते असे दिसून आले. म्हणून पोप ग्रेगरी याने त्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात असा फतवा काढला की ऑक्टोबर महिन्यात ४ तारखेनंतर दहा दिवस गाळावे व एकदम १५ तारीख घ्यावी. तसेच शतकाचे शेवटचे वर्ष लीप इयर घेऊ नये पण १६००, २००० ही वर्षे लीप इयर घ्यावी. तेव्हापासून हाच नियम लीप इयर बद्दल वापरला जातो. या सुधारणेनंतर या कॅलेंडरचे नाव ग्रेगेरियन कॅलेंडर असे पडले.
७. पोपचा फतवा त्याच्या अमलाखालील कॅथॉलिक राष्ट्रांनी लगेच अमलांत आणला. ब्रिटन, स्वीडन या प्रॉटेस्टंट राष्ट्रांनी मात्र १७० वर्षांनंतर १७५२-५३ मध्ये हा बदल केला. रशिया, ग्रीस ही राष्ट्रे कॅथॉलिक खरी पण त्यांचे ग्रीक चर्च हे पोपच्या लॅटिन चर्चपेक्षा वेगळे त्यामुळे रशियाने कम्युनिस्ट राज्यक्रांतीपर्यंत हा बदल केला नव्हता. तथाकथित ऑक्टोबर क्रांति प्रत्यक्षात नोव्हेंबरमध्ये झाली! ग्रीसने तर १९२३ मध्ये हा बदल अमलात आणला. युरोपातील या तथाकथित पुरोगामी राष्ट्रांनी हा आवश्यक बदल स्वीकारण्यास एवढा दीर्घ काळ घेतला.
८. पारशी धर्म व संस्कृति ही फार प्राचीन. त्यांची कालगणना आणखीनच गोंधळाची आहे. शिवाय इराणातील उरलेले पारशी व भारतातील पारशी यांच्यातहि फरक आहे. फसली, कदमी व शहेनशाही अशी तीन कॅलेंडरे त्यांच्यात प्रचारात आहेत. फसली पद्धतीप्रमाणे ३०दिवसांच्या १२ महिन्यांचे वर्ष होते. शेवटच्या महिन्यानंतर ५ किंवा लीप इयरच्या वर्षी ६ जादा बिननावाचे दिवस जोडले जातात. वर्षाची सुरवात वसंतसंपाताच्या दिवशी २३ मार्चला होते. संपात दिवस थोडाथॊडा मागे येत असल्याने तो एक दिवस मागे येईल तेव्हा बहुधा ते एक दिवस गाळतील! वर्षारंभ वसंतसंपाताला घेणे हे शास्त्रशुद्ध आहे. ग्रेगेरियन कॅलेंडरमध्येहि १ जानेवारीला वर्षारंभ करण्यापेक्षा वसंतसंपातापासून करणे योग्य होईल. पण हा बदल आता कठीण आहे! ही पद्धत भारतातील एका विद्वान पारशाने सुचवली व इराणात ती अमलात आली पण भारतातील पारशांनी ती स्वीकारलेली नाही! त्यांच्या इतर दोन पद्धती मला नीटशा कळल्याच नाहीत.
९. जगातील बहुतेक सर्व जुन्या संस्कृतींनी चांद्रवर्षावर आधारलेली कालगणना वापरली. यांत नवल नाही. काळाचे दिवस व वर्ष हे दोन मापक नॆसर्गिक आहेत. त्याचे मधले माप हे अमावास्या ते अमावास्या या सहज कळणाऱ्या नैसर्गिक घटनेशी निगडित असणे साहजिक आहे. मात्र चांद्र महिने व वर्ष यांची सांगड घालणे सोपे नसल्यामुळे त्याबाबत फरक पडलेले आहेत.

विविध कॅलेंडरे - भाग १

विविध धर्मी लोकांच्या वर्षगणनेची देत असलेली माहिती कोणा एकाच पुस्तकावरून दिलेली नाही. निरनिराळ्या वेब-साइट्स वरून ती जमा केलेली आहे. त्यामुळे लेखकाचे नाव देता येत नाही. क्षमस्व!
१. हिंदु कॅलेंडरे चांद्रमासावर आधारलेली असतात. दिवस सूर्योदयापासून सुरू होतो. सूर्यॊदयाचे वेळी चंद्राची जी तिथि चालू असेल ती त्या दिवसाची तिथि असते. त्यामुळे कलकत्त्याचे व मुंबईचे पंचांग एकाच तारखेला वेगळ्या तिथि दाखवू शकेल. मुंबईत व अमेरिकेत नक्कीच!
२. ज्यू लोकांचे कॅलेंडरहि काहीसे चांद्रगणनेवर आधारलेले आहे. ज्यूंचा दिवस मात्र सूर्यास्तापासून सुरू होतो. हिंदूंचा आठवडा सात दिवसांचा व प्रत्येक दिवसाला सोम-मंगळ अशी नावे आहेत. ज्यूंचाहि सात दिवसांचा सप्ताह असतो. पण पहिल्या सहा दिवसाना नावेच नाहीत. पहिला - दुसरा असे म्हणावयाचे. सातव्याचे नाव शब्बाथ. तो हिंदूंचा (बहुधा) रविवार.
३. ज्यूंचे वर्ष बारा महिन्यांचे. महिन्यांचे दिवस ३० व २९ आलटून पालटून येतात. मात्र आठवा व नववा महिना कधी २९ व कधी ३० दिवसांचा. त्याचे नियम क्लिष्ट आहेत. त्यामुळे वर्षाचे दिवस ३५३, ३५४ वा ३५५ कोणतेही असतात.
४. हिंदूंचे वर्ष १२ चांद्र महिन्यांचे व सौर वर्षाशी जुळवून घेण्यासाठी २८-२९ महिन्यांनंतर एक अधिक महिना येतो. त्याबद्दलचा नियम सूर्याच्या राशिसंक्रमणाशी जोडलेला व सुस्पष्ट आहे. ज्यू लोकहि अधिक महिना घेतात. मात्र त्याचे नियम वेगळे आहेत. दर १९ वर्षांच्या चक्रामध्ये ३,६,८,११,१४,१७ व १९ ही वर्षे अधिक महिन्याची. हा अधिक महिना दर वेळेला ११व्या महिन्यानंतरच येतॊ व तो ३० दिवसांचा असतो. बाराव्या महिन्याचे नाव अडार असे आहे. अधिक महिन्याचे नाव अडार-१ असे होते व बारावा महिना त्या वर्षी अडार-२ असे नाव घेतो. हिंदूंमध्येहि अधिक चैत्र व निज चैत्र असे म्हणतात.
५. हिंदु महिने नेहेमी शुक्लप्रतिपदेला (उत्तर भारतात कृष्णप्रतिपदेला) सुरू होतात. ज्यूंचे वर्ष (पहिला महिना) प्रतिपदेला सुरू होते. मात्र महिन्यांचे दिवस ३० वा २९ ठरलेल्या क्रमाने येत असल्यामुळे इतर महिन्यांची सुरवात प्रतिपदेला होतेच असे नाही. सर्व सणवार, उपासना दिवस त्यांच्या विशिष्ट महिन्याशी व दिवसाशी निगडित असतात.
इतर कालगणनांची माहिती पुढील भागात.

Thursday, April 3, 2008

सोमनाथ - भाग ५

मुस्लिम ग्रंथातील अतिशयोक्त वर्णनांवर विसंबून ब्रिटिश इतिहासकारानी व राज्यकर्त्यानी सोमनाथवरील स्वाऱ्यांना अवास्तव महत्व दिले. हिंदी स्थानिकांच्या लेखी फारसे महत्व नव्हते याची त्यानी दखल घेतली नाही. ब्रिटिशांना खरेच वाटले की महमुदाने सोमनाथमंदिराचे दरवाजे गझनीला नेले व नंतर ते महमुदाच्या कबरीला लावले गेले! भारतात इंग्रजी सत्ता स्थापन झाल्यावर ग. ज. लॉर्ड एलेन्बरॊ याने अफगाणिस्तानवर स्वारी केली होती. तिला फारसे यश मिळाले नव्हते. मात्र त्याने सैन्य परत आल्यावर असा जाहीरनामा काढला होता की आम्ही ते सोमनाथच्या देवळाचे दरवाजे जिंकून आणले आहेत व सोमनाथवरील हल्ल्यांचे उट्टे काढले आहे व हिंदुस्तानवरील कलंक पुसून टाकला आहे! या जाहीरनाम्याची भारतीय राजेरजवाड्यांनी वा हिंदु-मुस्लिम जनतेने मुळीच दखल घेतली नाही. प्रत्यक्षांत हे दरवाजे हिंदु बनावटीचे नव्हतेच. ते सोमनाथला कधीच पोहोचले नाहीत! ते आग्र्याला नेले असे म्हटले जाते. या अव्यापारेषु व्यापाराबद्दल ब्रिटिश पार्लमेंट मध्ये एलेन्बरोवर टीका झाली व त्याची थट्टा झाली!
स्वातंत्र्य मिळाल्यावर श्री. कन्हय्यालाल मुन्शी यांच्या जोरकस प्रयत्नांमुळे सोमनाथ मंदिराची पुन्हा बांधणी करण्याच्या मागणीला जोर आला. सरकारी पातळीवर हे करण्याला पं. नेहेरूंचा ठाम विरोध होता. एक स्वतंत्र ट्रस्ट त्यासाठी स्थापन झाला व त्याचेतर्फे देणग्या जमवून हे काम केले गेले. मात्र सौराष्ट्र सरकारने त्यासाठी पैसे खर्च केले. पं. नेहेरूना तेहि पसंत नव्हते पण त्यानी ते थांबवले नाही. राष्ट्रपति डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी उद घाटनाला जाऊ नये असा त्यांचा सल्ला होता. तो त्यांनी मानला नाही. निधर्मी राजवटीने यात भाग घेणे त्याना योग्य वाटत नव्हते. सरदार पटेलाना मंदिर बनवणे हवे होते पण सरकारी खर्च नको होता. त्यानी नेहेरूंवर दबाव आणला नाही. नव्याने बांधलेले हे मंदिर आता प्रवाशांचे आकर्षण झाले आहे.
लेखिकेचे एकूण मत सोमनाथवरील स्वाऱ्या हे हिंदु-मुसलमानांमधील वैराचे राष्ट्रीय पातळीवरील प्रतीक मानू नये व त्यांना अवास्तव महत्व देऊ नये असे दिसते. पुस्तकामध्ये लेखिकेचा या विषयाचा सखोल अभ्यास या वेगळ्या दृष्टिकोनाबरोबरच सहजच नजरेला येतो.

Sunday, March 30, 2008

सोमनाथ भाग ४

८. तेराव्या शतकाच्या अखेरीला सोमनाथवर अल्लाउद्दिन खिलजीची स्वारी झाली. अल्लाउद्दिन व रजपूत राजघराण्यांचे अनेक झगडे झाले. राज्यविस्तारासाठी अनेकदा खिलजीने राजस्थानवर स्वा़ऱ्या केल्या. या स्वारीच्या वेळी खिलजी राजस्थानातून पुढे सौराष्ट्रावरही चालून आला. याही हल्ल्यामागचा मूळ हेतू धार्मिक नसून राजकीय होता असे लेखिकेचे मत आहे. मंदिर परिसराच्या उत्खननातून असे दिसून आले की यावेळीहि मंदिराचा फार विध्वंस झाला नाही. लुटालूट झाली असणारच व लढाया-चकमकींमध्ये प्राणहानिही झाली असणार यांत संशय नाही. देवळाचा वापर चालूच राहिला. मात्र १४व्या शतकाच्या मध्यावर एकदा देवळातील लिंग बदलण्यात आले. त्यानंतर औरंगजेबाच्या काळापर्यंत मंदिराला हानि पोचली नाही. औरंगजेबाने त्याच्या कारकीर्दीच्या अखेरच्या काळात आपल्या अधिकाऱ्यांना हे मंदिर पाडून टाकून तेथे मशीद बनव्ण्याचा आदेश दिला होता. मंदिर पूर्णपणे पाडले गेले नाही. मंदिरावर बसका घुमट व छोटे मनोरे चढवण्यात आले. मंदिरातील मूर्ति वा लिंग (बहुधा) इतरत्र हलवले गेले. मंदिराचा वापर बंद झाला पण मशीद म्हणूनहि त्याचा वापर सुरू झाला नाही. परिसरातच भूमिगत मंदिर बनले, त्याचीच नंतर अहिल्याबाई होळकर यांनी सुधारणा केली व ते अजूनही वापरात आहे. मूळ मंदिर तसेच पडून राहिले. पहिल्या दोन हल्ल्यांपेक्षां औरंगजेबाच्या सैन्याने मंदिराची खरी हानि केली म्हटले पाहिजे. ही परिस्थिति स्वातंत्र्य मिळेपर्यंत कायम होती.

सोमनाथ भाग ३

५. या महमुदाच्या स्वारीसंदर्भात एक वेगळीच कथा लेखिकेने सांगितली आहे. या भागात मुस्लिम वस्ती पुष्कळ होती. मात्र ते बहुतेक शिया, अहमदिया, सूफी असे होते. सुन्नी फरसे नव्हते. अरबस्तानामध्ये महंमदाच्या काळाच्या आधीपासून काबा व इतरही तीन देवतांची उपासना होत असे. काबाचा प्रभाव फारच असल्यामुळे महंमदालाही काबाचा स्वीकार करण्यावाचून पर्याय नव्हता. अजूनही काबाची उपासना होतेच. इतर तीन देवतानाही महंमदाने सुरवातीला काही काळ स्वीकारले होते. मात्र नंतर त्याने ती मान्यता सैतानाच्या प्रभावाखाली दिली होती असे म्हटले व त्यांना धिक्कारले! त्या देवतांची देवळे नष्ट होऊ लागली. त्यातील एका देवतेचे नाव मनात असे होते. असे म्हटले जाई कीं मनातची मूर्ति वाचवण्यासाठी भारतात आणली गेली तोच सोमनात वा सोमनाथ! हे अर्थातच खरे नाही पण मुस्लिम ग्रंथातून असे उल्लेख वारंवार सापडतात असे लेखिका म्हणते!
६. देउळ परिसराच्या उत्खननातून असे दिसून येते - लेखिका म्हणते - की महमुदाच्या स्वारीनंतर चालुक्य राजा भीमदेव पहिला याने जे मंदिर दुरुस्तीचे काम केले त्यायोगे मंदिराचा विस्तार झाला नाही. डागडुजी झाली. त्यामुळे मंदिर कालांतराने खराब होत गेले. मात्र त्याच्यावर पुन्हा हल्ला झाला नाही. आणखी एक चालुक्य राजा कुमारपाल याने हे मंदिर पुन्हा नव्याने बांधले व ते मूळच्या मंदिरापेक्षा मोठे झाले. १३व्या शतकात अल्लाउद्दिन खिलजीच्या स्वारीपर्यंत हे मदिर वापरात होते.
७. सौराष्ट्रातील हिंदु व मुस्लिम समाजामध्ये वैरभावना नव्हती व दोन्ही समाजांमध्ये सलोखा व व्यापार-व्यवहार चालू होते असे लेखिकेचे प्रतिपादन आहे. याचे एक स्पष्ट व ठळक उदाहरण लेखिकेने दिले आहे. एका श्रीमंत अरब व्यापारी व्यक्तीला सोमनाथमध्ये एक मशीद बांधावयाची होती. त्यासाठी सोमनाथ मंदिराच्या मालकीच्या जमिनींतून एक तुकडा सोमनाथाचा व्यवहार पाहणाऱ्या पंच मंडळीनी त्या व्यापाऱ्याला विकत दिला. त्याशिवाय आणखीहि जमीन त्याला विकत दिली जिच्या उत्पन्नातून त्या मशिदीची देखभाल व्हावयाची होती. हा व्यवहार वर्णन करणारा संस्कृत व अरबी भाषांतील शिलालेख सोमनाथ परिसरांत मिळालेला आहे.

Saturday, March 29, 2008

सोमनाथ भाग २

४. महमुदाच्या स्वारीचा मुख्य उद्देश लूट हा होता. धर्मप्रसार नव्हे. किंवा मूर्तिभंजन नव्हे.पूर्वापार स्थानिक व्यापारावरील कर, यात्रेकरूंवरील कर, राजाश्रय वगैरेमुळे यामुळे सोमनाथमंदिराला वैभव प्राप्त झाले होते व त्याची माहिती अरब व्यापारी लोकांकडून महमुदापर्यंत पोचली होती. या स्वारीची स्थानिक वा जैन लिखाणातील वर्णने वा शिलालेखांतील वर्णने भडक वा अतिरंजित नाहीत. हिंदुधर्मावरील घाला अशा स्वरूपाची वर्णने नाहीत. मुस्लिम लिखाणामध्ये मूर्ति फोडल्याचे उल्लेख आहेत. हे शिवालय असल्यामुळे येथे मूर्तीऐवजी शिवलिंग असावयास हवे. मूर्ती फोडल्यावर तिच्या पोटातून हिरेमाणके बाहेर पडली असे वर्णन आहे! हे सर्व उघडच अतिशयोक्त आहे. महमुदाचे महत्व अरबी तुर्की जगतात वाढवण्यासाठी ही अतिशयोक्त वर्णने केली गेली असावी. बगदाद्चा खलिफा व गझनीचा महमूद यांच्यात चुरस होती. महमुदाला पूर्वेकडील खलिफा म्हणवून घ्यायचे होते. अतिशयोक्त वर्णनांमागे अशी कारणे होती. स्थानिक लोकांच्या दृष्टीने ही इतरांप्रमाणेच एक स्वारी व लूट होती म्हणून त्याचे फारसे प्रतिसाद उमतले नाहीत.
महमूद परत गेल्यावर देऊळ पुन्हा दुरुस्त होऊन वापरातहि आले. देवळाच्या उत्पन्नाचे स्त्रोत चालूच राहिल्यामुळे मंदिराला पुन्हा पूर्ववैभवहि प्राप्त झाले.

Tuesday, March 25, 2008

सोमनाथ - भाग १

श्रीमती रोमिला थापर यांचे सोमनाथ या नावाचे इंग्रजी पुस्तक हल्लीच माझ्या वाचनात आले. लेखिका इतिहासतद्न्य म्हणून प्रख्यात आहे. पुस्तक खूप विस्तृत आहे व सोमनाथाच्या इतिहासाचे निरनिराळ्या दृष्टिकोनांतून विवेचन केले आहे. सोमनाथमंदिराच्या इतिहासाबद्दल कितीतरी नवीन माहिती वाचावयास मिळाली. सोमनाथ मंदिरावरील महंमद गझनीच्या स्वारीपासून ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मंदिर पुन्हा बांधले गेले या घटनेपर्यंत अनेक घटनांचा मागोवा पुस्तकांत घेतलेला आहे.
१. सोमनाथ हे मुळात तीर्थक्षेत्र म्हणून प्राचीन काळापासून मानले गेलेले होते. मात्र प्राचीन काळापासून येथे मोठे मंदिर होते व ते विख्यात होते असे नव्हे. मूळचे मंदिर लहानसे स्थानिक देऊळ असावे.
२. स्वातंत्र्य मिळाल्यावर जेव्हा येथे नवे मंदिर बांधावयाचे ठरले तेव्हा पुरातत्व खात्यातर्फे येथे उत्खनन केले गेले. त्यावेळी मिळालेल्या पुराव्यांवरून येथील पहिले देऊळ ९व्या वा १०व्या शतकातील होते. ते बहूधा मूळराजा या चालुक्य राजाने मूळच्या लहानशा स्थानिक देवळाचे जागी बांधले होते.
३.१०२६ साली गझनीच्या स्वारीच्या वेळी या मंदिराचा पूर्ण विध्वंस झाला अशी आपली समजूत असते ते खरे नाही. मंदिराला काही प्रमाणात हानि पोचली व लुटालूट झाली. मंदिराची मशीद बनली नाही. या स्वारीची वर्णने बहुतेक सर्व अरबी, इराणी, व तुर्की लेखकांची आहेत व तीं अतिशयोक्त आहेत.
यापुढील हकीगत पुढील भागांत. ....

Monday, March 24, 2008

ब्लॉगची ओळख

मला वाचनाची आवड पूर्वीपासून आहे. निवृत्तीनंतर तो विरंगुळा आहे. वाचलेल्या पुस्तकांबद्दल इतरांशी बोलायलाही मला आवडते. आता या ब्लॉगमधून मी आवडलेल्या पुस्तकांबद्दल तुमच्याशी बोलणार आहे.

www.Blogwani.com
Locations of visitors to this page