हल्लीच वाचलेल्या एका पुस्तकाचा आज परिचय करून देणार आहे. जॅवियेर मोरो हे लेखकाचे नाव. महाराजा ऑफ कपुर्थळा आणि एक स्पॅनिश तरुणी यांची कहाणी या पुस्तकात वर्णिली आहे. पहिल्या महायुद्धाच्या पूर्वीचा काळ ही त्या कथेची सुरवातीची पार्श्वभूमि आहे. पुस्तकाचे प्रकाशन वर्ष माझेपाशी लिहिलेले नाही पण पुस्तक फार जुने नसावे. पुस्तक फार उच्च दर्जाचे नाही. पुस्तकात जागजागी भारतातील स्वातंत्र्यचळवळीचे व पुढार्यांचे आलेले उल्लेख अचूक वाटले नाहीत. संस्थानी वातावरणाची वर्णने करमणूक करतात. त्यात अतिशयोक्तिहि पुष्कळ आहे.
कपुर्थळाचा हा राजा त्याच्या बालवयात सत्तेवर आला कारण त्याचा पिता वारला. त्याचे शिक्षण बर्यापैकी झाले. त्याला इंग्लिश व फ्रेन्च उत्तम येत होते. तो फारसा जुनाट विचारसरणीचा नव्हता पण अखेर एक संस्थानिक होता! त्याचे राज्य व घराणे मात्र जुन्या वळणाचे होते. कपुर्थळा हे पंजाबमधील संस्थान आकाराने लहानसेच होते त्यामुळे फार श्रीमंत नव्हते मात्र, राजाच्या वैयक्तिक मालकीची खूप जमीन पूर्व उत्तर-प्रदेशात होती. १८५७च्या युद्धात त्यावेळच्या कपुर्थळा संस्थानिकाने ब्रिटिशाना मदत केल्यामुळे सरकारने ही जमीन त्याला भेट दिली होती. तिच्या उत्पन्नामुळे स्व्त: राजा मात्र खूप धनवान होता! राजाचे तीन विवाह झालेले होते व त्याला तीन पुत्र होते. इतर राणीवसा मोठा होता.
राजा युरोपच्या सफरीवर असताना फ्रान्समध्ये त्याचा अनिता डेल्गाडो या एका स्पॅनिश तरुणीशी परिचय झाला. ती एक गरीब पण बर्या घराण्यातील अशिक्षित मुलगी होती. तिला स्पॅनिशही जेमतेम लिहिता वाचता येत होते. ती थोडेफार नृत्य शिकली होती एवढेच! दोघी बहिणी हॉटेलान नाचून संसार चालवण्यास वडिलाना मदत करत होत्या. हॉटेलात बहिणीबरोबर नाचताना ती राजाला दिसली व तो तिच्यासाठी पागलच झाला. हरप्रयत्नाने तिच्या वारंवार भेटी घेऊन व ’भेटी’ देऊन तिला वश करण्याचा त्याने प्रयत्न चालवला. दोघांच्या वयामध्ये खूप फरक होता. त्याने अनिताला अखेर मागणीच घातली! मात्र तिच्या आईवडिलांनी स्पष्ट अट घातली की राजाने स्पॅनिश कायद्यानुसार तिच्याशी लग्न (सिव्हिल मॅरेज) केले पाहिजे. राजाने ते मान्य केले. ती अशिक्षित असल्यामुळे काही काळ तिला पॅरिसमध्ये ठेवून राजाने तिच्या शिक्षणाची व श्रीमंताचे रीतिरिवाजहि शिकवण्याची व्यवस्था केली. नंतर तिला कपुर्थळाला आणले. युरोप व कपुर्थळा यांच्यात महदंतर होते. तिला राजाच्या इतर राण्यांची व कुटुंबाचीहि कल्पना नव्हती. राजाने तिच्यासाठी स्वतंत्र निवासस्थान बांधले. हळूहळू तिला प्रमुख राणी मानले जाऊ लागले. मात्र ब्रिटिश व्हाइसराय व सरकार यांनी तिला कधीहि कपुर्थळाची राणी म्हणून मान्यता दिली नाही व राजाची इच्छा असूनहि त्याला त्याबाबत काही करता आले नाही. पुस्तकात तिच्या भारतातील वास्तव्याचे व तिच्या व्यक्तिमत्वात झालेल्या बदलाचे खुलासेवार दीर्घ वर्णन आहे. राजकुमारी अमृतकौर ही कपुर्थळाच्या राजघराण्याच्या एका ख्रिस्ती झालेल्या शाखेत जन्मलेली. तिची व अनिता डेल्गादो हिची घनिष्ट मैत्री होती.
दुसर्या महायुद्धातहि राजाने व संस्थानाने ब्रिटिशांना सर्व मदत केली. स्वातंत्र्य मिळाल्यावर संस्थान विलीन होण्याला अर्थातच काही पर्याय नव्हताच.
राजा वयाने मोठा तेव्हा कालांतराने त्याचे अनिताकडून लक्ष उडाले. अखेर तो महाराजा! त्याचा एक पुत्र अनिताचा समवयस्क होता. अनिताचे व त्याचे प्रेमसंबंध जुळले व ते राजाच्या ध्यानी आल्यावर त्याने अनिताला सरळ घटस्फोट दिला व स्पेनला परत जाणे भाग पाडले. तिला पैसे, दागदागिने, वेळोवेळी मिळालेल्या भारी भेटवस्तू नेऊ दिल्या. भरपूर पेन्शनही दिली. मात्र भारतात परत यावयाचे नाही अशी स्पष्ट अट घातलेली होती. सरकारनेही तिला त्यानंतर भारतात येऊ दिले नाही. तरीहि राजा युरोपात गेला तर तिला भेटत असे व त्यांची मैत्री राजाच्या मृत्यूपर्यंत कायम राहिली. तिच्या आईवडिलांच्या मृत्यूच्या वेळी पहिला शोकसंदेश त्याचेकडूनच पाठवला गेला. एका अशिक्षित मुलीने नशिबाने मिळालेले राणीपद व वैभव दीर्घकाळ उपभोगले होते व स्वत:ची वैयक्तिक उन्नति साधली होती.
राजाने खरेतर अनिताच्या आईला आपल्या तीन राण्यांच्या संसाराची पूर्ण माहिती दिली होती व अनिताला सांगावयास सांगितले होते. पण गरिबीमुळे राजाने देऊ केलेल्या संपत्तीला भुलून तिने अनिताला अंधारात ठेवले होते. ही गोष्ट कालांतरानेच अनिताला कळली पण तेव्हा वेळ निघून गेली होती.
Thursday, June 5, 2008
पॅशन इंडिया - अनिता डेलगाडोची कहाणी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment