Tuesday, March 9, 2010

ख्रिश्चन नावाचा सिंह

मित्रहो. बर्‍याच दिवसानी आज या ब्लॉगवर मी पुन्हा लिहीत आहे.
मी हल्लीच वाचलेल्या एका पुस्तकाचे ’ख्रिश्चन नावाचा सिंह’ हे शीर्षक आहे. ऍन्थनी (एस) बोर्क आणि जॉन रेंडॉल हे दोन तरुण मित्र व ख्रिश्चन नांवाचा त्यांचा सिंह यांच्यातील अजब प्रेमबंध व मैत्री यांची ही सत्यकथा आहे. १९७१ साली हे पुस्तक त्या दोघानी प्रथम प्रसिद्ध केले होते. त्याचे तेव्हां खूप स्वागत झाले होते. चार भाषांत ते प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर ख्रिश्चनच्या कथेवर दोन डॉक्युमेंटरी बनल्या. त्या अनेकवार टी. व्ही. दाखवल्या गेल्या व अतिशय लोकप्रिय झाल्या. मूळ पुस्तक मी वाचलेले नव्हते. आतां इतक्या वर्षांनंतर २००९ सालीं या दोघानी पुस्तकाची सुधारून वाढवलेली नवीन आवृत्ति प्रसिद्ध केली आहे ती माझ्या वाचनात आली. नवीन आवृत्ति काढण्याचे कारणहि खास आहे. ते पुढे कळेलच.
एस आणि जॉन हे दोघे ऑस्ट्रेलियन तरुण शिक्षण संपवून १९६९ साली लंडनला आले. त्यानी Kings Road वरील एका फर्निचरच्या दुकानात नोकरी धरली होती. Devon मधील एका लहानशा झू मधील एका सिंहाच्या जोडीला चार बछडे झाले. एक नर व तीन माद्या. त्यांतील एक नर व एक मादी लंडनमधील प्रख्यात Harrods या डिपार्टमेंटल स्टोअर्मध्ये विक्रीला ठेवलेलीं यांच्या नजरेस आलीं. त्यांनी त्यांतील नर बछडा विकत घ्यायचे ठरवले. त्याला आपण कसे संभाळणार याचा अडथळा त्यांना वाटला नाहीं. ते नोकरी करत असलेल्या दुकानाच्याच वर ते दोघे रहात होते व दुकानमालकाने त्यांना सिंहछावा पाळण्याची व दुकानाच्या बेसमेंटचा वापर करण्याचीहि परवानगी दिली. आवाक्याबाहेरचा खर्च करून त्यानी छावा खुशाल विकत घेतला व त्याचे नाव ’ख्रिश्चन’ ठेवले. सिंहछावा संभाळायचा तर त्याला बागडण्यासाठी भरपूर मोकळी जागा हवी, तोहि प्रश्न एका धर्मगुरूने सोडवला. त्याच्या चर्चच्या मोकळ्या पण बन्दिस्त आवारात ख्रिश्चनला मोकळे सोडून त्याचे बरोबर हे दोघे खेळत! दुकानात तो सर्वत्र मोकळेपणाने वावरत असे. गिर्‍हाइकेंही त्याची भीति न बाळगतां त्याच्याशी खेळत. त्याला संभाळण्याचा खर्च त्याना डोईजड होत होता. तो लहान होता तोंवर हे सर्व चालले होते. या काही महिन्यांच्या काळाचे अतिशय मनोरंजक वर्णन पुस्तकांत वाचावयास मिळते. या दोघाना दिसत होते कीं हे काही खरे नाही. ख्रिश्चन भराभर मोठा होत होता. त्याचे बळ वाढत होते. त्याचेबरोबर खेळताना त्याना जाणवत होते कीं आता याला आवरणे कठीण होत जाणार आहे. मात्र त्यांना ख्रिश्चनचा व त्याला त्यांचा फार लळा लागला होता. ख्रिश्चनने लंडनमध्ये इतरहि अनेक लहान-मोठे मित्र-मैत्रिणी मिळवले होते! पण पुढे याचे काय करावयाचे? एकतर झू किंवा एखादी सर्कस हे त्याचे भवितव्य त्याना दिसत होते. पण झू मधील लहानशा आवारातील कायमचे बंदिस्त आयुष्य किंवा सर्कशीतील छळ-शिस्त व पिंजरा ख्रिश्चनच्या वाट्याला येऊं नये असे त्याना वाटे. पण सिंह शौक म्हणून संभाळणारा मालक कोण मिळणार हेहि कळत नव्हते.
त्या प्रश्नाचे अनपेक्षित असे उत्तर पुढे आले. Born Free या नावाचा एक सिनेमा खूप गाजला होता. मानवसमाजात जन्मलेल्या व वाढलेल्या एका सिंहिणीची ती कहाणी होती. त्या सिंहिणीला पुन्हा मुक्त नैसर्गिक जीवन कसे मिळवून दिले गेले हा त्या सिनेमाचा विषय होता. जॉय आणि जॉर्ज ऍडॅमसन या जोडीने त्या मानवसान्निद्ध्यांत जन्मलेल्या व वाढलेल्या सिंहिणीला निसर्गात मोकळे सोडण्याचा प्रयोग यशस्वी केला होता. त्याचीच कथा Born Free या जॉयच्या पुस्तकात व सिनेमात मांडलेली होती. सिनेमात जॉय आणि जॉर्जच्या भूमिका Bill Travers and Virginia Mckenna यांनी केल्या होत्या. त्या दोघांनी ख्रिश्चनला पाहिले व एस आणि जॉनची अडचण त्याना समजली. त्यानाहि मनापासून वाटले कीं ख्रिश्चनला झू किंवा सर्कशीत आयुष्य काढावे लागूं नये. त्यानी जॉर्ज ऍडॅमसन व एस/जॉन यांची ओळख करून दिली. जॉर्ज आतां असा एक मोठा प्रयोग करणार होता कीं मानवसमाजात जन्मलेल्या सिंहांचा एक जथाच केनियाच्या जंगलात नैसर्गिक मुक्त जीवन जगण्यासाठी सोडावयाचा. त्यांत ख्रिश्चनचाहि समावेश करण्याचे त्याने मान्य केले. एस आणि जॉन याना अत्यानंद झाला. हा प्रयोग पार पाडणे सोपे नव्हते. त्यातील अनेक अडचणी व केलेले अनेक प्रयोग यांची कहाणी अतिशय रोचक आणि मूळ पुस्तकांतूनच वाचण्यासारखी आहे. ख्रिश्चन एक वर्षाचा होईपर्यंत त्याचा प्रेमाने संभाळ करून अखेर त्याला केनियांतील जंगलात सोडण्यासाठी त्याचेबरोबर ते दोघे तेथे गेले व जड अंत:करणाने जॉर्ज ऍडॅमसनचा व ख्रिश्चनचा निरोप घेऊन परतले. एक वर्षभर ख्रिश्चनची हकिगत व प्रगति त्याना कळत होती. वर्षानंतर ते पुन्हा केनियाला ख्रिश्चनला पाहण्यासाठी गेले. ख्रिश्चन आता मुक्त होता व एक सिंहीण व काही छाव्यांच्या छोट्या कळपाचा प्रमुख बनला होप्ता. त्याची पूर्ण वाढ झाली होती. त्यांना सांगण्यात आले कीं ख्रिश्चन आतां तुम्हाला ओळखणार नाही. मात्र प्रत्यक्षात, जेव्हां उघड्या मैदानात ख्रिश्चन त्यांचेसमोर आला तेव्हां त्याने दोघांना लगेच ओळखले व अंगावर उड्या मारमारून व चेहेरे जिभेने चाटून त्यांचे प्रचंड स्वागत केले. आपल्या जोडीच्या सिंहिणीशीं त्यांची ओळखही करून दिली!
मूळ पुस्तक येथे संपले होते. कित्येक वर्षे गेलीं. २००८ सालीं ख्रिश्चन व एस/जॉन यांच्या अखेरच्या भेटीचे जे व्हिडिओ चित्रण केले गेले होते ते YOUTUBE वर कोणीतरी टाकले. ती व्हिडिओक्लिप अतिशय लोकप्रिय झाली व लाखों लोकांनी ती पाहिली. आजतागायत क्लिप बघणारांचा आकडा दररोज वाढतो आहे. व काही कोटींवर गेला आहे. हे क्लिप प्रकरण एस/जॉन जोडीला कळले व त्या निमित्ताने त्यानी पुस्तकाची नवीन आवृत्ति काढली तींत ख्रिश्चनबरोबरचे त्यांचे व इतर मित्रांचे अनेक फोटो व ख्रिश्चनच्या अखेरच्या भेटीचेहि फोटो दिले आहेत. पुस्तक वाचून झाल्यावर मीहि YOUTUBE वर ती व्हिडिओक्लिप मुद्दाम पाहिली व उतरून घेतली. ती लेखाचे शेवटी पहावयास मिळेल. त्यांत ख्रिश्चनचे लंडनमधील जीवन, मग केनियाकडे गमन व अखेरची भेट असे सर्व आहे. एका अनोख्या विषयावरील हे पुस्तक मला खूप आवडले. आपणही ते वाचावे अशी माझी शिफारस आहे.

1 comment:

Sangeeta said...

khup chan zala aahe lekh

www.Blogwani.com
Locations of visitors to this page