मागील लेखामध्ये एका पुस्तकाचा इंग्रजीत परिचय लिहिला होता. त्याच विषयावर आज मराठीत पुन्हा लिहीत आहे. ’शब्दबंध’ कार्यक्रमामध्ये वाचण्यासाठी हा मराठी लेख तयार केला.
माझा तात्कालिक पुत्र
एका अनाथाची कहाणी
ले. तिमेरि मूर्ति
पेन्ग्वुइन बुक्स -२००५
एका अनाथ मुलाची ही एक अनोखी कहाणी आहे. भारतात अनाथ मुले ही काही नवलाईची गोष्ट नाही. या मुलाचे दुर्दैव व सुदैवहि एक प्रकारे अजबच म्हणावे लागेल. हे मूल जन्माला आले तेच अनेक व्याधि व व्यंगे घेऊन. त्याचे आईबाप अतिशय गरीब होते व अशा अपंग मुलाला संभाळणे त्याना अशक्य होते. जन्मल्यापासून काही थोड्या वेळानेच, त्यांनी त्याला रस्त्याच्या कडेला सोडून दिले होते. तीं कोण होतीं हें कधीच उघड झाले नाही. ही घटना चेन्नइ मधील असल्यामुळे, ते मूल रस्त्यावरून उचलले जाऊन अखेर चेन्नैमधील एका अनाथाश्रमात येऊन पोचले. त्या मुलाला उपजत इतकी व्यंगे होतीं की ते अल्पकाळाचेच आयुष्य भोगणार असेच कोणीहि म्हटले असते. त्याचा शरीराचा छातीच्या खालचा भाग नीट बनलेलाच नव्हता. त्याची मूत्र पिशवी शरीराबाहेरच होती. त्याचा लिंगभागही व्यवस्थित बनलेला नव्हता. ते जेमतेम जिवंत होते व अखंड वेदना भोगत होते. येवढ्या लहान वयातहि, वेदना असह्य झाल्यामुळे ते आपले डोके पाळण्याच्या कडेवर आपटत राही.
ही कथा त्या बालकाची आहे तशीच या लेखकाचीहि आहे. हा लेखक भारतीय आहे. तो पत्रकार, इंग्रजीमध्ये लेखन करणारा, कथा – कादंबर्या, सिनेमा कथा, नाटके व इतर अ-ललित लेखन करणारा आहे. त्याचे एकहि पुस्तक माझ्या वाचनात आलेले नव्हते. ही कथा त्या बालकाने लेखकाच्या घरात काढलेल्या एक वर्षाच्या काळाची आहे. कथा अतिशय चटका लावणारी आहे व पुस्तक खालीं ठेववत नाहीं.
हे मूल खरे तर त्या अनाथाश्रमात अल्प काळाने मरूनच जावयाचे. पण घोर दुर्दैवाबरोबर ते कोठेतरी मोठे सुदैवहि घेऊन जन्मले होते. लेखकाची पत्नी, मूळची ऑस्ट्रेलियन, आणि समाजकार्य करणारी. चेन्नईतील इतर राष्ट्रांच्या कॉन्सुलेट्मध्ये काम करणारे अभारतीय, त्यांच्या बायका, इतर देशी-विदेशी समाजकार्यकर्ते अशांचा मोठा गोतावळा तिच्या बरोबर होता. या बाईंचे नाव मॉरीन. त्या अनाथाश्रमाला त्या वेळोवेळी भेट देत असत. अशाच एका भेटीच्या वेळी हे दुर्दैवी मूल तिच्या नजरेला आले. तिने त्याच्या समस्यांमध्ये लक्ष घालण्याचे ठरवले. अनाथाश्रमाचे काम पाहणार्या डॉक्टरने याच्या बाबतीत हात झटकले होते. मॉरीनने मुलाला उचलून एका सर्जनकडे नेले. त्याने तपासल्यावर फारशी आशा दाखवली नाही. थोडीफार रिपेअर सर्जरी करता येईल पण मूल नॉर्मल होणार नाही आणि जगण्याची आशा फारशी नाही असे त्याचे मत पडले. मॉरीन सहज हार मानणारी नव्हती. चेन्नईमधील प्रख्यात डॉ. श्रीपति यांना भेटण्याचे तिने ठरवले. भेटीची वेळ मिळवण्यापासून तिला आपल्या ओळखी वापराव्या लागल्या. मात्र डॉ. श्रीपतिनी आशा दाखवली. पुष्कळ सर्जरी करावी लागेल पण मूल बरेचसे नॉर्मल होईल. मात्र काही वर्षांनी प्लॅस्टिक सर्जरी करून त्याच्या लिंगात सुधारणा करावी लागेल असे म्हटले. (एव्हाना तपासण्यांवरून तो मुलगा असल्याचे निष्पन्न झाले होते.) खर्च अर्थातच खूप मोठा होता पण आपल्या मित्रपरिवाराच्या मदतीने तो प्रश्न सोडवता येईल ही तिला खात्री होती. पण सर्जरीपूर्वी व नंतरही मुलाला दीर्घकाळ माया व सेवा यांची खरी गरज होती. अनाथालयातून ती कशी भागणार हा खरा प्रष्न होता. या वेळपर्यंत लेखकाने या मुलाच्या समस्यांमध्ये मुळीच लक्ष घातले नव्हते. मात्र दुरून तो पत्नीची धडपड पहात होता. सर्जिकल काम डॉ. श्रीपति यांनी सर्व कौशल्य वापरून पुरे केले. त्यानंतर इलाजच न उरल्यामुळे मॉरीन त्या मुलाला सरळ आपल्या घरी घेऊन आली! एव्हाना मुलाचे नाव भीम पडले होते.
हे पुस्तक एक सत्य कथा आहे. भीम घरी आल्यावर लेखक त्याच्यांत कसा गुंतत गेला याचे अतिशय हृद्य वर्णन पुस्तकात सविस्तर वाचावयास मिळते. भीम घरी आल्यावर पहिल्याच रात्रीं तो लेखक व त्याची पत्नी या दोघांच्या मध्ये झोपला होता पण अविरत रडत होता. अखेर दमल्यामुळे थांबला. मग त्याचा हात लेखकाच्या हातावर पडला. कोणाही व्यक्तीचा स्पर्श म्हणजे वेदना असे भीमाच्या मनात घट्ट समीकरण बनले होते. पण लेखकाचा हा पहिला स्पर्श त्याला, कां कोण जाणे, पण आश्वासक वाटला आणि तेव्हांपासून दोघांमध्ये नवेच नाते जुळूं लागले. यापुढील काळातील भीमाची वाढ, प्रकृतीत सुधारणा, प्रगतीचे टप्पे, त्याची दिसून येणारी हुषारी, लेखकाचे त्याच्यात अधिकाधिक गुंतत जाणे याचे सविस्तर वर्णन पुस्तकांत वाचावयास मिळते. हा प्रवास सोपा मुळीच नव्हता. भीम फार रडका होता, त्यांतहि तो रात्रीं फार रडे. सांभाळण्यास ठेवलेल्या मुलीचा नाइलाज झाला कीं तिला भीमाला लेखक व मॉरीन यांच्याच स्वाधीन करावें लागे. प्रथमचा अलिप्तपणा केव्हांच जाऊन लेखक भीमाला आपलेंच मूल मानण्यापर्यंत केव्हां पोंचला हे त्यालाच कळले नाही. भीम थोडे बोलू लागला ते अर्थात इंग्लिश शब्द व सांभाळणार्या मुलीमुळे तामिळ शब्द. लेखकाचे मोठे घर, बाग यांत त्याचा संचार चाले. औषधे, उपचार हे चालूच होते व खर्चहि खूप होत होता पण लेखकाला त्याचा भार सोसतां येत होता.
लेखकाच्या पत्नीचा प्रथमपासून प्रयत्न होता कीं भीमाला कोणीतरी दत्तक घ्यावें. तिच्या मैत्रिणींनीहि या दिशेने प्रयत्न सुरू ठेवले होते. हें अर्थातच सोपे नव्हते. भीम हा एक अपंग बालक म्हणून जन्माला आला होता. त्याला आयुष्यभर औषधोपचारांची, शस्त्रक्रियांची गरज पडणार होती. दत्तक घेणार्याला हें सर्व परवडणे आवश्यक होतें. भीम हा अनाथ असल्यामुळे त्याला दत्तक घेण्याची सरकारी परवानगी मिळवणे हेहि सरकारी नियमांच्या कडक बंधनांमुळे कसोटी पाहणारें होतें. त्या सर्व खटपटीचे लेखकाने खुलासेवार वर्णन केले आहे. लेखकाचे मन भीमामध्ये दिवसेंदिवस इतके गुंतत गेले कीं आपणच भीमाला कां दत्तक घेऊं नये असे त्याला वाटे. पण स्वत:चे साठीचे वय विचारांत घेतले की त्याला जाणवे कीं पुढे त्याच्या उमेदीच्या वयांत आपण त्याच्यावर भारच टाकणार. तेव्हां आपण मन मारले पहिजे. सरकारी नियमांप्रमाण येवढ्या वयाच्या व्यक्तीला असे अनाथ मूल दत्तक घेतां येत नाहीं हीहि अडचण होतीच. त्याच्या जिवाची होणारी ओढाताण व तगमग त्याने सुरेख वर्णन केली आहे.
अखेर एका डच तरुण कुटुंबाने भीमाला दत्तक घ्यायचे असे ठरले. परवानग्यांचे सर्व सोपस्कार लेखक व मॉरीन यांनी व मॉरीनच्या मैत्रिणीने पुरे केले आणि ते जोडपे भीमाला भेटण्यासाठी व नेण्यासाठी चेन्नाईला आलें. त्यांना भीमाचा सहवास मिळावा म्हणून लेखकाने त्यांना आपल्या घरीच आणले. भीमालाही त्यांच्याशी जुळवून घेणे सोपे नव्हते. भीम आपल्याजवळून जाणार हे माहीत असूनहि स्वीकारणे लेखक व मॉरीन दोघांनाहि आणि भीमालाहि अतिशय अवघड होते. पण इलाज नव्हता.
पुस्तकाच्य़ा अखेरच्या भागात, भीम परदेशीं गेल्यानंतर काही काळाने लेखक इंग्लंडला गेला असताना तेथून भीमच्या दत्तक घरी गेला व तेथे त्याच्या आईवडिलांच्या, आजी-आजोबांच्या व त्यांच्या इतर अनेक नातेवाइक, मित्रमैत्रिणींच्या प्रेमाच्या सावलीत तो सुखाने वाढतो आहे, इंग्रजी विसरला आहे, पण तरीहि आपल्याला व मॉरीनला तो विसरलेला नाही हे पाहून समाधानाने परत आला असे वर्णन वाचावयास मिळते.
एखादे पुस्तक खालीं ठेववत नाहीं असा आपणा सर्वांना अनुभव येतो. मला या पुस्तकाचा असाच अनुभव आला.
Monday, June 8, 2009
माझा तात्कालिक पुत्र
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment