Wednesday, September 15, 2010

एरी कॅनाल

अमेरिकेत असताना एरी कॅनाल बद्दल एक पुस्तक माझ्या वाचनात आले. त्याचा विषय अगदीच अपरिचित पण कुतूहल चाळवणारा होता. नंतर कॉम्प्यूटर वर शोध घेतला तेव्हा दिसले कीं या विषयावर शेकडो पुस्तके लिहिलीं गेलीं आहेत! तेव्हाच माझ्या मनात आले कीं ’सोबती’मध्ये या विषयावर एक माहितीपूर्ण व्याख्यान देतां येईल. त्या हेतूने मग कांही टिपण्या तयार केल्या व माहिती जमा केली. त्या आधारावर हा लेख लिहिला आहे.
एरी कॅनाल हा उत्तर अमेरिकेतील एक मानवनिर्मित जलप्रवाह आहे. तो बांधण्याचा हेतु माल आणि प्रवासी वाहतूक हा होता. थोडाथोडका नव्हे तर तब्बल ३६३ मैल लांबीचा हा कालवा एरी सरोवराच्या काठावरील बफेलो शहरापासून निघून हडसन नदीच्या काठावरील अल्बनी शहरापर्यंत जातो. १८१७ पासून १८३२ पर्यंत याचे काम चालले पण १८२५ पासून टप्प्याटप्प्याने हा वाहतुकीस खुला झाला. म्हणजे पेशवाई बुडाल्याचा हा काळ आहे!
हे सर्व वाचताना मला प्रथमच जाणवले कीं आपल्याला हे सर्व नवीन आहे. आपल्या माहितीत म्हणजे, कालवे हे नदी वा सरोवराचे पाणी शेतीला वा पिण्यासाठी पुरवण्यासाठी असतात! ते आपल्याकडेहि फार जुन्या काळापासून होते आणि स्वातंत्र्य मिळाल्यावर मोठीं धरणे व कालवे आपल्या समोरच बनले. काही थोडेच कालवे वीज निर्मितीसाठी पाणी वाहून नेण्यासाठीहि बनलेले आपल्याला माहितीत असतात उदा. लोणावळ्यातील, वलवंड धरणापासून खोपोलीच्या जलविद्युत प्रकल्पापर्यंत पाणी वाहून नेणारा कालवा. पण माल वा प्रवासी वाहतुकीसाठी मानवाने बनवलेला कालवा भारतात एकहि मला माहीत नाही. चूकभूल माफ.
पण मग अमेरिकेत असा कालवा बनवण्याची कल्पना कोणाला व अचानक कशी सुचली? असे अचानक काही क्वचितच होते, बहुधा काहीतरी पूर्वपीठिका असतेच. पनामा किंवा कील कालवा बांधताना सुएझ कालव्याची पीठिका होती कीं! हे तीनही कालवे दोन समुद्र जोडणारे आहेत व खूप मोठे असून त्यातून मोठाल्या बोटी जाऊं शकतात हे आपल्याला माहीत आहे. मग मला प्रश्न पडला कीं प्रथम सुएझ कालवा बांधताना कोणती पीठिका होती? आपण शाळेत वाचले कीं फर्डिनंड लेसेप्स या फ्रेन्च इंजिनिअरने सुएझ कालवा बांधला. त्याला अचानक कसे सुचले कीं येथे एक कालवा खणून भूमध्य व तांबडा समुद्र जोडावे? त्याची पीठिका थोड्या शोधण्यानंतर दिसली ती अशी कीं फार जुन्या काळी एका इजिप्शियन राजाने दक्षिणउत्तर वाहणारी व भूमध्य समुद्राला मिळणारी नाइल नदी तांबड्या समुद्राला जोडणारा एक पूर्व-पश्चिम कालवा खोदला होता व तो बराच काळ वापरात होता. कालांतराने तो गाळाने भरून गेला, तांबड्या समुद्राची लांबीहि कमी झाली व त्याचे उत्तरेकडील टोक भरून जाऊ लागले. परिणामी कालव्यातून जहाज तांबड्या समुद्रात उतरू शकत नाहीसे झाले व कालवा बंद पडला. मात्र कालव्याचे तुकडे खंदक स्वरूपात शिल्लक होतेच. पुढे नेपोलिअनने इजिप्तवर स्वारी केली तेव्हां त्याला या जुन्या कालव्याची गोष्ट कानावर आली. त्याच्या बरोबर इंजिनिअर व सर्व्हेअर होते. नाइल ऐवजीं भूमध्य समुद्राकाठच्या अलेक्झांड्रिआ बंदरापासून तांबड्या समुद्रापर्यंत उत्तर दक्षिण कालवा बनवावा अशी कल्पना पुढे आली. सर्व्हे करताना काहीतरी चुका झाल्या व असा गैरसमज झाला कीं दोन्ही समुद्रांच्या पाणीपातळीत ४०-५० फुटांचा फरक आहे! त्यामुळे कालव्याची कल्पना सोडून दिली गेली. पण काही वर्षांनंतर दिसून आले कीं पातळीतील फरक अगदीं थोडा -४-५फूटच - आहे. मग एक कंपनी स्थापन करून व इजिप्तच्या राजाकडून कालव्याची जागा १०० वर्षांच्या कराराने मिळवून कालवा बनवला गेला. त्यांत इजिप्तच्या राजाची ४०टक्के मालकी होती मात्र लवकरच चैनीसाठी पैसे मिळवण्यासाठी आपला हिस्सा त्याने ब्रिटिशांना विकला. कालवा आजतागायत वापरात आहे. मात्र स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, नासरच्या काळात, तो इजिप्तने ताब्यात घेतला हा आपल्याला परिचित इतिहास आहे. आतां सुएझ कालव्याकडून पुन्हा एरी कॅनालकडे वळूं.
इंग्लंड व युरोपांत इतरत्रहि माल व प्रवासीवाहतुकीसाठी लहान-मोठे कालवे बनवण्याची पीठिका होती. कालव्यांतून सपाटतळाच्या बोटी किंवा तराफ्यांतून मालवाहतूक फार स्वस्त पडते कारण कालव्याच्या काठावर बनवलेल्या निरुंद पायवाटेवरून घोड्याच्या सहायाने वा माणसांकडून अशी होडी वा तराफा ओढून नेणे सोपे जाते. त्या काळात रस्ते फारसे चांगले नसल्यामुळे घोड्यांनी वा बैलांनी ओढण्याच्या गाड्यांतून वा त्यांच्या पाठीवर लादून किंवा डोईओझ्याने होणारी मालवाहतूक महाग व वेळखाऊ होत असे. इंग्लंडात एका कोळशाच्या खाणीपासून शहरापर्यंत कोळसा वाहून नेण्यासाठी खाण मालकाने 1761 साली बांधलेला खासगी मालकीचा कालवा (bridgewater canal) उपयुक्त व फार फायदेशीर ठरला होता व त्यानंतर असे अनेक कालवे इंग्लंडात व युरोपांत बनले होते. त्याच धर्तीवर एरी कॅनाल बनवण्याची कल्पना पुढे आली. मात्र एवढा लांब कालवा कोठेच बनलेला नव्हता.
अमेरिकेतील सुरवातीच्या सर्व वसाहती अटलांटिकच्या किनार्‍यापासच्या भागांत झाल्या व हळूहळू वस्ती आणि शेती पश्चिमेकडे वाढत गेली. पण उत्तर-दक्षिण पसरलेल्या अपेलेशियन पर्वताची रांग ही नैसर्गिक मर्यादा ठरली होती. ही पर्वताची ओळ ओलांडून पश्चिमेला जाण्यासाठी सुलभ मार्ग नव्हते त्यामुळे कालांतराने हळूहळू पर्वतापलीकडे नवीन वसणार्‍या पण अतिशय सुपीक भागांतील शेतीमालाला बाजारपेठ नव्हती. उत्तरेकडील सरोवरांतून हा माल कॅनडाकडे बोटींतून जाई. त्या व्यापाराचा फयदा कॅनडाला मिळत होता! यावर उपाय म्हणून अपेलेशिअन पर्वतांतून पूर्वेला वाहणार्‍या पोटोमॅक नदीच्या खोर्‍यांतून कालवा बनवावा अशी कल्पना पहिल्याने पुढे आली व जॉर्ज वॉशिंग्टनने ती उचलून धरली. मात्र पुष्कळ खर्च झाल्यावर असे दिसून आले कीं या खोर्‍यात फार जास्त उतार आहे त्यामुळे कालवा सोयिस्कर होणार नाही. त्यामुळे वॉशिंग्टन पश्चात हा कालवा बारगळला. नंतर थोड‍या उत्तरेला असलेल्या मोहॉक नदीचा विचार पुढे आला. एरी सरवराच्या काठच्या बफेलो शहरापासून कालवा काढून तो पूर्वेला मोहॉक नदीच्या खोर्‍यांतून नेऊन हडसन नदी, जी उत्तर-दक्षिण वाहून न्यूयॉर्कपाशी अटलांटिकला मिळते, तिच्या काठावरील अल्बनी शहरापाशी त्या हडसन नदीला मिळवावा असा महत्वाकांक्षी प्रस्ताव मांडला गेला. या कालव्यांतून एरी वगैरे सरोवरांच्या दक्षिणेच्या सर्व नवीन वस्तीच्या भागांतील शेतीमाल, सरळ न्यूयॉर्कपर्यंत जाऊन पुढे युरोपपर्यंतहि निर्यात करतां येईल अशी आशा निर्माण झाली. मात्र हा लांबलचक कालवा बनवणे सोपे मुळीच नव्हते. हा कालवा बांधण्याची कल्पना जरी अठराव्या शतकाच्या उत्तरार्धापासूनच मांडण्यात येत होती तरी तिला फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. एरी सरोवरापासून अल्बनीपर्यंत ६०० फुटांचा उतार होता. मालवाहतुकीचे कालवे उतरते असत नाहीत कारण पाणी वाहून नेणे हा त्यांचा उद्देशच नसतो. त्यामुळे कालवा वाटेत आवश्यक तेथे उतरवण्यासाठी Locks बनवावी लागतात. त्या काळच्या बांधकाम साहित्याच्या व तांत्रिक प्रगतीच्या मर्यादांमुळे एका lock मध्ये फार तर १२-१३ फूट उतार ठेवता येत होता. त्यामुळे ५०-६० locks बांधावीं लागणार होतीं व खर्च खूप येणार होता, हे त्याचे कारण होते.
१७८४ पासून मांडले गेलेल्या या कालव्याचा जोरदार प्रचार जेसे हॉवले नावाच्या एका कर्जबाजारी होऊन तुरुंगात पडलेल्या व्यापार्‍याने दीर्घकाळ चालवला. मग जोसेफ हेलिकॉट नावाच्या जमिनी विकण्याचा व्यापार करणार्‍याने त्याचा पाठपुरावा चालवला कारण पर्वतापलीकडच्या मुलखातील त्याच्या विकाऊ जमिनीना भाव मिळत नव्हता! प्रेसिडेंट जेफरसनने कालव्याची कल्पना नाकारली होती पण न्यूयॉर्क राज्याचा गव्हर्नर क्लिंटन याला त्यातून न्यूयॉर्क राज्य व बंदर यांच्या विकासाचा मार्ग दिसत होता. त्याने कालव्याचा जोरदार पुरस्कार चालवला. मात्र केंद्र सरकारने कालव्याचा खर्च करण्यास व्हर्जिनिया वगैरे इतर मोठ्या व श्रीमंत राज्यांचा विरोध होता कारण कालव्याचा फायदा मुख्यत्वे न्यूयॉर्क राज्याला मिळणार होता. अखेर न्यूयॉर्कमधील व्यापारी वगैरेंच्या दबावामुळे न्यूयॉर्क राज्याने १८१७ साली ७० लाख डॉलर खर्च करून हा कालवा स्वत:च बांधण्याचे ठरवले. विरोधकांनी उपरोधाने या कालव्याचे नाव क्लिंटनचा खंदक असे ठेवले होते.
३६३ मैल लांबीचा हा कालवा बफेलो पासून अल्बनी पर्यंत जाणार होता. कालव्याला नावापुरताच उतार ठेवावयाचा होता. तरीहि काही पाणी सारखे वाहून जाणारच होते त्यासाठीच कालवा एरी सरोवरापासूनच सुरू व्हायचा होता म्हणजे पाणी कायम मिळत राहील. एरी सरोवराचे पाणी नायगारा नदीतून वाहत जाऊन नायगारा धबधब्यातून खालीं पडून पुढे त्याच नायगारा नदीतून पुढच्या ऑंटारिओ सरोवराकडे वाहत जाते हे आपणास माहीत असेल. त्यातले थोडेसेच पाणी या कालव्यातून वाहणार होते. कालवा ४० फूट रुंद व फक्त चार फूट खोल करावयाचा होता. खोदलेली माती एकाच काठावर रचून बनणार्‍या बंधार्‍यावर रुंदशी पायवाट बनवायची होती. पाण्याखाली फक्त साडेतीन फूट जाणारी सपाट तळाची तराफ्यासारखी मोठी होडी घोड्यांच्या सहायाने या वाटेवरून कालव्यातून ओढली जाणार होती. कालव्याच्या एकाच बाजूस अशी वाट असल्यामुळे दोन बोटी समोरासमोर आल्या तर एकमेकांना ओलांडून जाणे हे एक दिव्यच असे. कालव्याच्या बाजू दगडात बांधून काढल्या व तळाला मात्र घट्ट चिखलाचेच आवरण होते. दगडी बांधकामावर शेकडो जर्मन गवंड्यांनी काम केले आणि नंतर त्यानीच न्यूयॉर्कमधील अनेक प्रसिद्ध इमारती बांधल्या.
१८१७ मध्ये काम सुरू झाले पण दोन वर्षात फक्त १५ मैल काम झाले. या वेगाने काम पुरे होण्यास ३० वर्षे लागली असती! मुख्य अडचण वाटेत येणारी अनंत मोठी झाडे काढणे ही होती. मात्र कारागिरांनी नवनवीन युक्त्या योजल्या व झाडाचे बुधे उपटण्यासाठी घोड्यांनी ओढण्याचीं साधी पण उपयुक्त यंत्रे बनवलीं. मग कामाचा वेग वाढला पण मजुरांचा तुटवडा, मार्गावरील बर्‍याच भागांतील रोगट हवामान या अडचणी होत्याच. मुख्य अडचण तज्ञ व्यक्तींची होती. कोणाही थोडेफार शिकलेल्या माणसाला मुकादम, सर्व्हेअर बनवावे लागे. अमेरिकेत तेव्हां तांत्रिक शिक्षणाची कोणतीहि सोय सुरू झालेली नव्हती त्यामुळे इंग्लंड वा युरोपमध्ये थोडाफार अनुभव घेतलेल्या माणसांवरच विसंबून रहावें लागे. याची मुख्य अडचण locks बांधण्यामध्ये येत होती. मात्र अनुभवातून शिकत अनेकांनी या सर्व अडचणींवर मात करीत प्रावीण्य मिळवले आणि पुढे बांधकाम क्षेत्रात मोठे नावहि कमावले.
या सर्व अवघड कामांत दोन मुख्य गोष्टींचा उल्लेख करणार आहें. एक म्हणजे, अनेक ठिकाणी कालवा, नद्या, ओढे ओलांडून पलीकडे नेण्यासाठी मोठे पूल बांधावे लागले. अशा पुलावरून वाहने नव्हे तर पाणी जावयाचे होते. पूर्वानुभव नसूनहि असे अनेक लहान मोठे पूल बांधले गेले. आपल्याकडे असे पूलहि दुर्मिळ आहेत. माझ्या माहितीत भीमेवरील उजनी धरणाच्या जलाशयापासून डाव्या बाजूने सुरू होणारा एक मोठा कालवा भीमा नदी अशा खूप मोट्या पुलाच्या सहाय्याने ओलांडून उजव्या बाजूला नेलेला आहे. सोलापुराहून रस्त्याने पंढरपुरास जाताना डाव्या बाजूला तो पूल दिसतो.
दुसरी गोष्ट म्हणजे कालव्यावर एकेरी लॉक्स अनेक ठिकाणी झालीं पण बफेलोपासून जवळच, ज्या कड्यावरून नायगारा धबधबा उडी मारतो त्याच कड्याच्या पूर्वेकडील दूरच्या भागावरून कालवा अल्बनीकडे नेण्यासाठी खाली उतरवावयाचा होता. त्यासाठी एकापुढे एक चिकटून अशीं ५-६ Locks बांधणे आवश्यक होते. मोठ्या कष्टाने सुरुंगानी कडा फोडून काढून व अतिशय कौशल्याने दगडी बांधकाम करून तीं बांधलीं गेलीं. तेथे या कालव्यावरच्या मालवाहतुकीचे एक जमिनीवरचे बंदरच बनले व त्याचे नावच Lockport झाले. अजूनहि ते शहर त्याच नावाने अस्तित्वात आहे व त्याचे जवळच जुनी व मागाहून नव्याने बांधलेली लॉक्सहि आहेत.
१८२० साली कालव्याचा मधला भाग पुरा झाला व धान्य व मीठ वाहतुकीसाठी लगेच उपयोगी ठरू लागला. सेप्टेंबर १८२३ मध्ये २५० मैलांचा अल्बनी येथे हडसन नदीला मिळणारा पूर्व भागहि समारंभपूर्वक खुला झाला. त्याच दिवशी अल्बनी पासून उत्तरेला जाणारा ६४ मैलाचा आणखी एक कालवाही सुरू झाला. १८२५ साली एरी कालव्याचे सर्व काम पुरे झाले. सर्व राज्यभर अनेक समारंभ झाले. मुख्य म्हणजे खुद्द गव्हर्नर क्लिंटन आणि पाहुणे, यानी दहा दिवस बोटीतून बफेलो पासून न्यूयॉर्कपर्यंत प्रवास केला आणि अशक्य वाटलेले स्वप्न प्रत्यक्षात आणले. एरी सरोवराचे पाणी समुद्रात आणि समुद्राचे पाणी सरोवरात टाकण्यात आले! काशीची गंगा रामेश्वरास पोचली!
कालव्यामुळे न्यूयॉर्क बंदराचे महत्व अतोनात वाढले. सर्व उत्तर-मध्य अमेरिकेचा व्यापार येथून होऊ लागला. खुद्द बफेलो शहराची वस्ती २० वर्षात २०० वरून १८००० वर गेली.
मूळ कालव्यातून वर्षाला १५ लाख टन मालवाहतूक अपेक्षित होती ती गति केव्हाच गाठली गेली. त्यामुळे १८३४ सालींच कालव्याच्या दुरुस्ती व वाढीचे मोठ्या खर्चाचे काम हातात घेतले गेले. यामध्ये कालव्याची रुंदी ४० फुटांवरून ७० फुटांपर्यंत वाढवली गेली. आणि खोलीहि ४ फुटांवरून ७ फूट झाली. बर्‍याच ठिकाणी नवीन Locks आणि अ‍ॅक्विडक्ट (नद्यांवरचे पूल) बांधले गेले. बांधकामाचे शिक्षण घेतलेलीं तज्ञ माणसे व उच्च दर्जाचे सिमेंट मिळूं लागल्यामुले हे शक्य झाले. कित्येक ठिकाणी कालव्याची लाइनच बदलून लांबी कमी करतां आली. मूळ कालव्यांतील काही छोटे तुकडे वापरण्याची गरज राहिली नाही व त्यांचा करमणुकीसाठी उपयोग होऊ लागला. १८६२ साली हे काम पुरे झाले. नंतरहि वेळोवेळी काही सुधारणा होतच राहिल्या. मुख्य कालव्याला येऊन मिळणारे काही उपकालवेहि बांधले गेले. अमेरिकेत इतरत्रहि असे कालवे बांधले गेले. १९०५ ते १९१८ या काळात या कालव्याची पुन्हा वाढ व सुधारणा झाली. दहा कोटि डॉलर खर्च झाले. मालवाहतूक ५२ लाख टनावर पोचली. रस्ते आणि रेल्वे यांची भराभर वाढ होत गेली तसे कालांतराने हे आकडे कमी होत गेले.
एरी कालव्यामुळे न्यूयॉर्क राज्य व बंदराची प्रचंड भरभराट झाली. सरोवरांच्या प्रदेशात लोकवस्ती झपाट्याने वाढली. आयरिश मजूर लोकांनी कालव्यावर फार काम केले होते त्यांची वस्ती मार्गावरील अनेक गावा-शहरांत झाली. कालव्यातून प्रवासी वाहतूकहि मोठ्या प्रमाणावर होत असे. अनेक मॉर्मॉन लोकांचे तांडे या कालव्यातून जाऊन पुढे साल्ट लेक सिटी भागात स्थिरावले.
वापरातून जवळपास गेलेल्या या कालव्यातून गेली काही वर्षे पुन्हा काही खास मालाची - मुख्यत्वे अवजड व मोठ्या आकाराच्या वस्तू - वाहतूक होऊं लागलेली आहे.
कालव्याचा अजूनहि अनेक प्रकारे हौशी प्रवाशांसाठी उपयोग कल्पकतेने केला जातो. उदा. बोटी चालवणे, बाजूच्या पायवाटेने सायकली चालवणे, वाटेवर जागजागी हॉटेल्स - मॉटेल्स काढून प्रवाशांना सुखसोयी देणे वगैरे.
अशी या आपल्याला अपरिचित अशा प्रकल्पाची माहिती या पुस्तकावरून मिळते ती वाचकांना मनोरंजक वाटेल.

2 comments:

सुदीप मिर्ज़ा said...

Thanks for such an informative article...

Anonymous said...

Your all "blogs" are really useful....

Regards,
Jayant Phatak
htpp://full2dhamaal.wordpress.com

www.Blogwani.com
Locations of visitors to this page