Wednesday, May 14, 2008

भारताचा थोर गणिती - श्रीनिवास रामानुजम - भाग ३

काही मित्रांच्या सल्ल्याने त्याने ठरवले कीं आपले काम गणितातील परदेशी तज्ञांच्या नजरेला आणावे. त्यासाठी त्याने केंब्रिज मधील तीन थोर गणितज्ञांना पत्र लिहून आपल्या कामाची विस्तृत माहिती कळवली व मार्गदर्शनाची विनंति केली. दोघांनी काही दखल घेतली नाही. मात्र सुदैवाने तिसऱ्या, हार्डी नावाच्या विख्यात गणितज्ञाने त्याच्या पत्राची दखल घेतली. प्रथम त्यालाही, भारतातील मद्रास पोर्ट ट्रस्ट मध्ये कारकुनी करणाऱ्या व फक्त शाळा शिकलेल्या माणसाने गणितातील नवीन प्रमेये शोधल्याचा दावा करावा हे हास्यास्पदच वाटले होते व त्याने पत्र बाजूलाच ठेवून दिले होते. मात्र पत्राला जोडलेल्या पानांतून लिहिलेल्या प्रमेयांची त्याच्या अंतर्मनाने दखल घेतली असावी. कारण पत्राचा विचार त्याची पाठ सोडीना! हार्डी हा जगप्रसिद्ध गणितज्ञ, शिक्षकी पेशाच्या आईबापांचा मुलगा, मध्यमवर्गीय, क्रिकेटची आवड असणारा, अंतर्बाह्य ब्रिटिश, केंब्रिज विद्यापीठाचा फेलो, अशा व्यक्तिमत्वाचा होता. रामानुजमच्या पत्रात त्याला त्याच्या असामान्य प्रतिभेच्या खुणा दिसत होत्या. त्याने त्याचे वजन वापरण्याचे ठरवले. ब्रिटिश सरकारचे इंडिया ऑफिस, मद्रासचा गव्हर्नर, मद्रास युनिव्हर्सिटी या सर्व ठिकाणी त्याने रामानुजमला मद्रास युनिव्हर्सिटीने शिष्यवृत्ति द्यावी यासाठी आग्रह चालवला. युनिव्हर्सिटीला प्रश्न पडला कीं शाळेच्या पुढे न शिकलेल्या व्यक्तीला संशोधन शिष्यवृत्ति कशी काय द्यावी? पण हार्डी साहेब आग्रह धरतो आहे त्याला नाही कसे म्हणावे? व्हाइस चॅन्सेलरने अखेर दाखवून दिले कीं संशोधनाला उत्तेजन देणे हे घटनेप्रमाणे आपले काम आहे व हा इसम या कामाला योग्य आहे असे खुद्द हार्डीसाहेब म्हणतो आहे तेहा शंका घेणारे आपण कोण? अखेर युनिव्हर्सिटीने रामानुजमला महिना ७५ रुपयांची शिष्यवृत्ति मंजूर केली. आतां गणिताला सर्व वेळ देण्यास रामानुजम पूर्ण मोकळा झाला.
एवढ्याने हार्डीसाहेबाचे बिलकुल समाधान झाले नाही. त्याची खात्री पटली होती कीं रामानुजम केंब्रिजला आला तरच त्याच्या प्रतिभेला खरा न्याय मिळेल. त्याने लिहून कळवलेली अनेक प्रमेये खरी वाटत होतीं पण त्यांची पायरीपायरीने सिद्धता पद्धतशीरपणे सिद्ध करून दाखवल्याशिवाय त्याना वा रामानुजमला गणिताच्या जगात मान्यता मिळणार नव्हती. रामानुजमला याची आवश्यकता समजत नव्हती! तसेच मद्रासच्या डबक्यातून बाहेर पडून तो केंब्रिजच्या समुद्रात उतरल्याशिवाय त्याच्या प्रतिभेला खरा बहर येणार नव्हता. आपण रामानुजमच्या बरोबर एकत्र बसून गणितसंशोधन करावे अशी त्याला आच लागली होती. म्हणून त्याने रामनुजमला निरोप पाठवला कीं तूं केंब्रिजला ये! ज्या भारतीय गणितज्ञाकडे हा निरोप आला त्याने परभारेच उत्तर पाठवले कीं धर्मबंधनामुळे समुद्र ओलांडून रामानुजम केंब्रिजला येऊ शकणार नाही. हार्डीने विषय सोडून दिला नाही. त्याचा नॅव्हिल नावाचा मित्र मद्रासला गणितावर व्याख्याने देण्यासाठी येणार होता त्याच्याकडे त्याने रामानुजमला समजावण्याची कामगिरी दिली. त्याच्या भेटीनंतर रामानुजमने केम्ब्रिजला येण्याचे मान्य केले.! कुलस्वामिनीच्या दर्शनाला जाऊन, तिचा मला साक्षात्कार झाला आहे असे आईला समजावले. मोठमोठे लोक आपल्या मुलाला मानतात व कॉलेजात नापास झालेल्या आपल्या मुलाला खास शिष्यवृत्ति मिळते याचा कोठेतरी तिच्या मनावर ठसा उमटला असावा. तिने मान्य केले.
केंब्रिजला जावयाचे तर खर्चाचे काय हा प्रश्न होताच. हार्डी व त्याचा एक मित्र लिटलवुड यांनी व्यक्तिश: वर्षाला पन्नास पौंड खर्च करण्याची तयारी ठेवली होती. पण तेवढ्याने काहीच भागणार नव्हते. इंडिया ऑफिसने हात झटकले मात्र मद्रास युनिव्हर्सिटीने प्रवासखर्च व दोन वर्षांच्या खर्चासाठी ६०० पौंड एवढी भरघोस मदत दिली. त्यामुळे प्रश्न सुटला! १९१३ च्या मार्चमध्ये रामानुजम बोटीने केंब्रिजला रवाना झाला. ट्रिनिटी कॉलेजने त्याला हॉस्टेलला रहावयास जागा दिली व युनिव्हर्सिटीच्या ग्रंथालयाची कवाडे त्याला खुली झाली! प्रोफेसर हार्डीने त्याला आपल्या पंखाखाली घेतले. रामानुजमच्या प्रतिभेचा रथ आता चौखूर उधळू लागला!

2 comments:

साळसूद पाचोळा said...

श्रीयुत फडणीस,

आपला उपक्रम अगदी स्तुत्य आहे.
लवकरच नवीन नवीन पुस्तकांची ओळख होणार याचा आनंद आहे.

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

धन्यवाद.

www.Blogwani.com
Locations of visitors to this page