Wednesday, September 15, 2010

एरी कॅनाल

अमेरिकेत असताना एरी कॅनाल बद्दल एक पुस्तक माझ्या वाचनात आले. त्याचा विषय अगदीच अपरिचित पण कुतूहल चाळवणारा होता. नंतर कॉम्प्यूटर वर शोध घेतला तेव्हा दिसले कीं या विषयावर शेकडो पुस्तके लिहिलीं गेलीं आहेत! तेव्हाच माझ्या मनात आले कीं ’सोबती’मध्ये या विषयावर एक माहितीपूर्ण व्याख्यान देतां येईल. त्या हेतूने मग कांही टिपण्या तयार केल्या व माहिती जमा केली. त्या आधारावर हा लेख लिहिला आहे.
एरी कॅनाल हा उत्तर अमेरिकेतील एक मानवनिर्मित जलप्रवाह आहे. तो बांधण्याचा हेतु माल आणि प्रवासी वाहतूक हा होता. थोडाथोडका नव्हे तर तब्बल ३६३ मैल लांबीचा हा कालवा एरी सरोवराच्या काठावरील बफेलो शहरापासून निघून हडसन नदीच्या काठावरील अल्बनी शहरापर्यंत जातो. १८१७ पासून १८३२ पर्यंत याचे काम चालले पण १८२५ पासून टप्प्याटप्प्याने हा वाहतुकीस खुला झाला. म्हणजे पेशवाई बुडाल्याचा हा काळ आहे!
हे सर्व वाचताना मला प्रथमच जाणवले कीं आपल्याला हे सर्व नवीन आहे. आपल्या माहितीत म्हणजे, कालवे हे नदी वा सरोवराचे पाणी शेतीला वा पिण्यासाठी पुरवण्यासाठी असतात! ते आपल्याकडेहि फार जुन्या काळापासून होते आणि स्वातंत्र्य मिळाल्यावर मोठीं धरणे व कालवे आपल्या समोरच बनले. काही थोडेच कालवे वीज निर्मितीसाठी पाणी वाहून नेण्यासाठीहि बनलेले आपल्याला माहितीत असतात उदा. लोणावळ्यातील, वलवंड धरणापासून खोपोलीच्या जलविद्युत प्रकल्पापर्यंत पाणी वाहून नेणारा कालवा. पण माल वा प्रवासी वाहतुकीसाठी मानवाने बनवलेला कालवा भारतात एकहि मला माहीत नाही. चूकभूल माफ.
पण मग अमेरिकेत असा कालवा बनवण्याची कल्पना कोणाला व अचानक कशी सुचली? असे अचानक काही क्वचितच होते, बहुधा काहीतरी पूर्वपीठिका असतेच. पनामा किंवा कील कालवा बांधताना सुएझ कालव्याची पीठिका होती कीं! हे तीनही कालवे दोन समुद्र जोडणारे आहेत व खूप मोठे असून त्यातून मोठाल्या बोटी जाऊं शकतात हे आपल्याला माहीत आहे. मग मला प्रश्न पडला कीं प्रथम सुएझ कालवा बांधताना कोणती पीठिका होती? आपण शाळेत वाचले कीं फर्डिनंड लेसेप्स या फ्रेन्च इंजिनिअरने सुएझ कालवा बांधला. त्याला अचानक कसे सुचले कीं येथे एक कालवा खणून भूमध्य व तांबडा समुद्र जोडावे? त्याची पीठिका थोड्या शोधण्यानंतर दिसली ती अशी कीं फार जुन्या काळी एका इजिप्शियन राजाने दक्षिणउत्तर वाहणारी व भूमध्य समुद्राला मिळणारी नाइल नदी तांबड्या समुद्राला जोडणारा एक पूर्व-पश्चिम कालवा खोदला होता व तो बराच काळ वापरात होता. कालांतराने तो गाळाने भरून गेला, तांबड्या समुद्राची लांबीहि कमी झाली व त्याचे उत्तरेकडील टोक भरून जाऊ लागले. परिणामी कालव्यातून जहाज तांबड्या समुद्रात उतरू शकत नाहीसे झाले व कालवा बंद पडला. मात्र कालव्याचे तुकडे खंदक स्वरूपात शिल्लक होतेच. पुढे नेपोलिअनने इजिप्तवर स्वारी केली तेव्हां त्याला या जुन्या कालव्याची गोष्ट कानावर आली. त्याच्या बरोबर इंजिनिअर व सर्व्हेअर होते. नाइल ऐवजीं भूमध्य समुद्राकाठच्या अलेक्झांड्रिआ बंदरापासून तांबड्या समुद्रापर्यंत उत्तर दक्षिण कालवा बनवावा अशी कल्पना पुढे आली. सर्व्हे करताना काहीतरी चुका झाल्या व असा गैरसमज झाला कीं दोन्ही समुद्रांच्या पाणीपातळीत ४०-५० फुटांचा फरक आहे! त्यामुळे कालव्याची कल्पना सोडून दिली गेली. पण काही वर्षांनंतर दिसून आले कीं पातळीतील फरक अगदीं थोडा -४-५फूटच - आहे. मग एक कंपनी स्थापन करून व इजिप्तच्या राजाकडून कालव्याची जागा १०० वर्षांच्या कराराने मिळवून कालवा बनवला गेला. त्यांत इजिप्तच्या राजाची ४०टक्के मालकी होती मात्र लवकरच चैनीसाठी पैसे मिळवण्यासाठी आपला हिस्सा त्याने ब्रिटिशांना विकला. कालवा आजतागायत वापरात आहे. मात्र स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, नासरच्या काळात, तो इजिप्तने ताब्यात घेतला हा आपल्याला परिचित इतिहास आहे. आतां सुएझ कालव्याकडून पुन्हा एरी कॅनालकडे वळूं.
इंग्लंड व युरोपांत इतरत्रहि माल व प्रवासीवाहतुकीसाठी लहान-मोठे कालवे बनवण्याची पीठिका होती. कालव्यांतून सपाटतळाच्या बोटी किंवा तराफ्यांतून मालवाहतूक फार स्वस्त पडते कारण कालव्याच्या काठावर बनवलेल्या निरुंद पायवाटेवरून घोड्याच्या सहायाने वा माणसांकडून अशी होडी वा तराफा ओढून नेणे सोपे जाते. त्या काळात रस्ते फारसे चांगले नसल्यामुळे घोड्यांनी वा बैलांनी ओढण्याच्या गाड्यांतून वा त्यांच्या पाठीवर लादून किंवा डोईओझ्याने होणारी मालवाहतूक महाग व वेळखाऊ होत असे. इंग्लंडात एका कोळशाच्या खाणीपासून शहरापर्यंत कोळसा वाहून नेण्यासाठी खाण मालकाने 1761 साली बांधलेला खासगी मालकीचा कालवा (bridgewater canal) उपयुक्त व फार फायदेशीर ठरला होता व त्यानंतर असे अनेक कालवे इंग्लंडात व युरोपांत बनले होते. त्याच धर्तीवर एरी कॅनाल बनवण्याची कल्पना पुढे आली. मात्र एवढा लांब कालवा कोठेच बनलेला नव्हता.
अमेरिकेतील सुरवातीच्या सर्व वसाहती अटलांटिकच्या किनार्‍यापासच्या भागांत झाल्या व हळूहळू वस्ती आणि शेती पश्चिमेकडे वाढत गेली. पण उत्तर-दक्षिण पसरलेल्या अपेलेशियन पर्वताची रांग ही नैसर्गिक मर्यादा ठरली होती. ही पर्वताची ओळ ओलांडून पश्चिमेला जाण्यासाठी सुलभ मार्ग नव्हते त्यामुळे कालांतराने हळूहळू पर्वतापलीकडे नवीन वसणार्‍या पण अतिशय सुपीक भागांतील शेतीमालाला बाजारपेठ नव्हती. उत्तरेकडील सरोवरांतून हा माल कॅनडाकडे बोटींतून जाई. त्या व्यापाराचा फयदा कॅनडाला मिळत होता! यावर उपाय म्हणून अपेलेशिअन पर्वतांतून पूर्वेला वाहणार्‍या पोटोमॅक नदीच्या खोर्‍यांतून कालवा बनवावा अशी कल्पना पहिल्याने पुढे आली व जॉर्ज वॉशिंग्टनने ती उचलून धरली. मात्र पुष्कळ खर्च झाल्यावर असे दिसून आले कीं या खोर्‍यात फार जास्त उतार आहे त्यामुळे कालवा सोयिस्कर होणार नाही. त्यामुळे वॉशिंग्टन पश्चात हा कालवा बारगळला. नंतर थोड‍या उत्तरेला असलेल्या मोहॉक नदीचा विचार पुढे आला. एरी सरवराच्या काठच्या बफेलो शहरापासून कालवा काढून तो पूर्वेला मोहॉक नदीच्या खोर्‍यांतून नेऊन हडसन नदी, जी उत्तर-दक्षिण वाहून न्यूयॉर्कपाशी अटलांटिकला मिळते, तिच्या काठावरील अल्बनी शहरापाशी त्या हडसन नदीला मिळवावा असा महत्वाकांक्षी प्रस्ताव मांडला गेला. या कालव्यांतून एरी वगैरे सरोवरांच्या दक्षिणेच्या सर्व नवीन वस्तीच्या भागांतील शेतीमाल, सरळ न्यूयॉर्कपर्यंत जाऊन पुढे युरोपपर्यंतहि निर्यात करतां येईल अशी आशा निर्माण झाली. मात्र हा लांबलचक कालवा बनवणे सोपे मुळीच नव्हते. हा कालवा बांधण्याची कल्पना जरी अठराव्या शतकाच्या उत्तरार्धापासूनच मांडण्यात येत होती तरी तिला फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. एरी सरोवरापासून अल्बनीपर्यंत ६०० फुटांचा उतार होता. मालवाहतुकीचे कालवे उतरते असत नाहीत कारण पाणी वाहून नेणे हा त्यांचा उद्देशच नसतो. त्यामुळे कालवा वाटेत आवश्यक तेथे उतरवण्यासाठी Locks बनवावी लागतात. त्या काळच्या बांधकाम साहित्याच्या व तांत्रिक प्रगतीच्या मर्यादांमुळे एका lock मध्ये फार तर १२-१३ फूट उतार ठेवता येत होता. त्यामुळे ५०-६० locks बांधावीं लागणार होतीं व खर्च खूप येणार होता, हे त्याचे कारण होते.
१७८४ पासून मांडले गेलेल्या या कालव्याचा जोरदार प्रचार जेसे हॉवले नावाच्या एका कर्जबाजारी होऊन तुरुंगात पडलेल्या व्यापार्‍याने दीर्घकाळ चालवला. मग जोसेफ हेलिकॉट नावाच्या जमिनी विकण्याचा व्यापार करणार्‍याने त्याचा पाठपुरावा चालवला कारण पर्वतापलीकडच्या मुलखातील त्याच्या विकाऊ जमिनीना भाव मिळत नव्हता! प्रेसिडेंट जेफरसनने कालव्याची कल्पना नाकारली होती पण न्यूयॉर्क राज्याचा गव्हर्नर क्लिंटन याला त्यातून न्यूयॉर्क राज्य व बंदर यांच्या विकासाचा मार्ग दिसत होता. त्याने कालव्याचा जोरदार पुरस्कार चालवला. मात्र केंद्र सरकारने कालव्याचा खर्च करण्यास व्हर्जिनिया वगैरे इतर मोठ्या व श्रीमंत राज्यांचा विरोध होता कारण कालव्याचा फायदा मुख्यत्वे न्यूयॉर्क राज्याला मिळणार होता. अखेर न्यूयॉर्कमधील व्यापारी वगैरेंच्या दबावामुळे न्यूयॉर्क राज्याने १८१७ साली ७० लाख डॉलर खर्च करून हा कालवा स्वत:च बांधण्याचे ठरवले. विरोधकांनी उपरोधाने या कालव्याचे नाव क्लिंटनचा खंदक असे ठेवले होते.
३६३ मैल लांबीचा हा कालवा बफेलो पासून अल्बनी पर्यंत जाणार होता. कालव्याला नावापुरताच उतार ठेवावयाचा होता. तरीहि काही पाणी सारखे वाहून जाणारच होते त्यासाठीच कालवा एरी सरोवरापासूनच सुरू व्हायचा होता म्हणजे पाणी कायम मिळत राहील. एरी सरोवराचे पाणी नायगारा नदीतून वाहत जाऊन नायगारा धबधब्यातून खालीं पडून पुढे त्याच नायगारा नदीतून पुढच्या ऑंटारिओ सरोवराकडे वाहत जाते हे आपणास माहीत असेल. त्यातले थोडेसेच पाणी या कालव्यातून वाहणार होते. कालवा ४० फूट रुंद व फक्त चार फूट खोल करावयाचा होता. खोदलेली माती एकाच काठावर रचून बनणार्‍या बंधार्‍यावर रुंदशी पायवाट बनवायची होती. पाण्याखाली फक्त साडेतीन फूट जाणारी सपाट तळाची तराफ्यासारखी मोठी होडी घोड्यांच्या सहायाने या वाटेवरून कालव्यातून ओढली जाणार होती. कालव्याच्या एकाच बाजूस अशी वाट असल्यामुळे दोन बोटी समोरासमोर आल्या तर एकमेकांना ओलांडून जाणे हे एक दिव्यच असे. कालव्याच्या बाजू दगडात बांधून काढल्या व तळाला मात्र घट्ट चिखलाचेच आवरण होते. दगडी बांधकामावर शेकडो जर्मन गवंड्यांनी काम केले आणि नंतर त्यानीच न्यूयॉर्कमधील अनेक प्रसिद्ध इमारती बांधल्या.
१८१७ मध्ये काम सुरू झाले पण दोन वर्षात फक्त १५ मैल काम झाले. या वेगाने काम पुरे होण्यास ३० वर्षे लागली असती! मुख्य अडचण वाटेत येणारी अनंत मोठी झाडे काढणे ही होती. मात्र कारागिरांनी नवनवीन युक्त्या योजल्या व झाडाचे बुधे उपटण्यासाठी घोड्यांनी ओढण्याचीं साधी पण उपयुक्त यंत्रे बनवलीं. मग कामाचा वेग वाढला पण मजुरांचा तुटवडा, मार्गावरील बर्‍याच भागांतील रोगट हवामान या अडचणी होत्याच. मुख्य अडचण तज्ञ व्यक्तींची होती. कोणाही थोडेफार शिकलेल्या माणसाला मुकादम, सर्व्हेअर बनवावे लागे. अमेरिकेत तेव्हां तांत्रिक शिक्षणाची कोणतीहि सोय सुरू झालेली नव्हती त्यामुळे इंग्लंड वा युरोपमध्ये थोडाफार अनुभव घेतलेल्या माणसांवरच विसंबून रहावें लागे. याची मुख्य अडचण locks बांधण्यामध्ये येत होती. मात्र अनुभवातून शिकत अनेकांनी या सर्व अडचणींवर मात करीत प्रावीण्य मिळवले आणि पुढे बांधकाम क्षेत्रात मोठे नावहि कमावले.
या सर्व अवघड कामांत दोन मुख्य गोष्टींचा उल्लेख करणार आहें. एक म्हणजे, अनेक ठिकाणी कालवा, नद्या, ओढे ओलांडून पलीकडे नेण्यासाठी मोठे पूल बांधावे लागले. अशा पुलावरून वाहने नव्हे तर पाणी जावयाचे होते. पूर्वानुभव नसूनहि असे अनेक लहान मोठे पूल बांधले गेले. आपल्याकडे असे पूलहि दुर्मिळ आहेत. माझ्या माहितीत भीमेवरील उजनी धरणाच्या जलाशयापासून डाव्या बाजूने सुरू होणारा एक मोठा कालवा भीमा नदी अशा खूप मोट्या पुलाच्या सहाय्याने ओलांडून उजव्या बाजूला नेलेला आहे. सोलापुराहून रस्त्याने पंढरपुरास जाताना डाव्या बाजूला तो पूल दिसतो.
दुसरी गोष्ट म्हणजे कालव्यावर एकेरी लॉक्स अनेक ठिकाणी झालीं पण बफेलोपासून जवळच, ज्या कड्यावरून नायगारा धबधबा उडी मारतो त्याच कड्याच्या पूर्वेकडील दूरच्या भागावरून कालवा अल्बनीकडे नेण्यासाठी खाली उतरवावयाचा होता. त्यासाठी एकापुढे एक चिकटून अशीं ५-६ Locks बांधणे आवश्यक होते. मोठ्या कष्टाने सुरुंगानी कडा फोडून काढून व अतिशय कौशल्याने दगडी बांधकाम करून तीं बांधलीं गेलीं. तेथे या कालव्यावरच्या मालवाहतुकीचे एक जमिनीवरचे बंदरच बनले व त्याचे नावच Lockport झाले. अजूनहि ते शहर त्याच नावाने अस्तित्वात आहे व त्याचे जवळच जुनी व मागाहून नव्याने बांधलेली लॉक्सहि आहेत.
१८२० साली कालव्याचा मधला भाग पुरा झाला व धान्य व मीठ वाहतुकीसाठी लगेच उपयोगी ठरू लागला. सेप्टेंबर १८२३ मध्ये २५० मैलांचा अल्बनी येथे हडसन नदीला मिळणारा पूर्व भागहि समारंभपूर्वक खुला झाला. त्याच दिवशी अल्बनी पासून उत्तरेला जाणारा ६४ मैलाचा आणखी एक कालवाही सुरू झाला. १८२५ साली एरी कालव्याचे सर्व काम पुरे झाले. सर्व राज्यभर अनेक समारंभ झाले. मुख्य म्हणजे खुद्द गव्हर्नर क्लिंटन आणि पाहुणे, यानी दहा दिवस बोटीतून बफेलो पासून न्यूयॉर्कपर्यंत प्रवास केला आणि अशक्य वाटलेले स्वप्न प्रत्यक्षात आणले. एरी सरोवराचे पाणी समुद्रात आणि समुद्राचे पाणी सरोवरात टाकण्यात आले! काशीची गंगा रामेश्वरास पोचली!
कालव्यामुळे न्यूयॉर्क बंदराचे महत्व अतोनात वाढले. सर्व उत्तर-मध्य अमेरिकेचा व्यापार येथून होऊ लागला. खुद्द बफेलो शहराची वस्ती २० वर्षात २०० वरून १८००० वर गेली.
मूळ कालव्यातून वर्षाला १५ लाख टन मालवाहतूक अपेक्षित होती ती गति केव्हाच गाठली गेली. त्यामुळे १८३४ सालींच कालव्याच्या दुरुस्ती व वाढीचे मोठ्या खर्चाचे काम हातात घेतले गेले. यामध्ये कालव्याची रुंदी ४० फुटांवरून ७० फुटांपर्यंत वाढवली गेली. आणि खोलीहि ४ फुटांवरून ७ फूट झाली. बर्‍याच ठिकाणी नवीन Locks आणि अ‍ॅक्विडक्ट (नद्यांवरचे पूल) बांधले गेले. बांधकामाचे शिक्षण घेतलेलीं तज्ञ माणसे व उच्च दर्जाचे सिमेंट मिळूं लागल्यामुले हे शक्य झाले. कित्येक ठिकाणी कालव्याची लाइनच बदलून लांबी कमी करतां आली. मूळ कालव्यांतील काही छोटे तुकडे वापरण्याची गरज राहिली नाही व त्यांचा करमणुकीसाठी उपयोग होऊ लागला. १८६२ साली हे काम पुरे झाले. नंतरहि वेळोवेळी काही सुधारणा होतच राहिल्या. मुख्य कालव्याला येऊन मिळणारे काही उपकालवेहि बांधले गेले. अमेरिकेत इतरत्रहि असे कालवे बांधले गेले. १९०५ ते १९१८ या काळात या कालव्याची पुन्हा वाढ व सुधारणा झाली. दहा कोटि डॉलर खर्च झाले. मालवाहतूक ५२ लाख टनावर पोचली. रस्ते आणि रेल्वे यांची भराभर वाढ होत गेली तसे कालांतराने हे आकडे कमी होत गेले.
एरी कालव्यामुळे न्यूयॉर्क राज्य व बंदराची प्रचंड भरभराट झाली. सरोवरांच्या प्रदेशात लोकवस्ती झपाट्याने वाढली. आयरिश मजूर लोकांनी कालव्यावर फार काम केले होते त्यांची वस्ती मार्गावरील अनेक गावा-शहरांत झाली. कालव्यातून प्रवासी वाहतूकहि मोठ्या प्रमाणावर होत असे. अनेक मॉर्मॉन लोकांचे तांडे या कालव्यातून जाऊन पुढे साल्ट लेक सिटी भागात स्थिरावले.
वापरातून जवळपास गेलेल्या या कालव्यातून गेली काही वर्षे पुन्हा काही खास मालाची - मुख्यत्वे अवजड व मोठ्या आकाराच्या वस्तू - वाहतूक होऊं लागलेली आहे.
कालव्याचा अजूनहि अनेक प्रकारे हौशी प्रवाशांसाठी उपयोग कल्पकतेने केला जातो. उदा. बोटी चालवणे, बाजूच्या पायवाटेने सायकली चालवणे, वाटेवर जागजागी हॉटेल्स - मॉटेल्स काढून प्रवाशांना सुखसोयी देणे वगैरे.
अशी या आपल्याला अपरिचित अशा प्रकल्पाची माहिती या पुस्तकावरून मिळते ती वाचकांना मनोरंजक वाटेल.

Tuesday, March 9, 2010

ख्रिश्चन नावाचा सिंह

मित्रहो. बर्‍याच दिवसानी आज या ब्लॉगवर मी पुन्हा लिहीत आहे.
मी हल्लीच वाचलेल्या एका पुस्तकाचे ’ख्रिश्चन नावाचा सिंह’ हे शीर्षक आहे. ऍन्थनी (एस) बोर्क आणि जॉन रेंडॉल हे दोन तरुण मित्र व ख्रिश्चन नांवाचा त्यांचा सिंह यांच्यातील अजब प्रेमबंध व मैत्री यांची ही सत्यकथा आहे. १९७१ साली हे पुस्तक त्या दोघानी प्रथम प्रसिद्ध केले होते. त्याचे तेव्हां खूप स्वागत झाले होते. चार भाषांत ते प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर ख्रिश्चनच्या कथेवर दोन डॉक्युमेंटरी बनल्या. त्या अनेकवार टी. व्ही. दाखवल्या गेल्या व अतिशय लोकप्रिय झाल्या. मूळ पुस्तक मी वाचलेले नव्हते. आतां इतक्या वर्षांनंतर २००९ सालीं या दोघानी पुस्तकाची सुधारून वाढवलेली नवीन आवृत्ति प्रसिद्ध केली आहे ती माझ्या वाचनात आली. नवीन आवृत्ति काढण्याचे कारणहि खास आहे. ते पुढे कळेलच.
एस आणि जॉन हे दोघे ऑस्ट्रेलियन तरुण शिक्षण संपवून १९६९ साली लंडनला आले. त्यानी Kings Road वरील एका फर्निचरच्या दुकानात नोकरी धरली होती. Devon मधील एका लहानशा झू मधील एका सिंहाच्या जोडीला चार बछडे झाले. एक नर व तीन माद्या. त्यांतील एक नर व एक मादी लंडनमधील प्रख्यात Harrods या डिपार्टमेंटल स्टोअर्मध्ये विक्रीला ठेवलेलीं यांच्या नजरेस आलीं. त्यांनी त्यांतील नर बछडा विकत घ्यायचे ठरवले. त्याला आपण कसे संभाळणार याचा अडथळा त्यांना वाटला नाहीं. ते नोकरी करत असलेल्या दुकानाच्याच वर ते दोघे रहात होते व दुकानमालकाने त्यांना सिंहछावा पाळण्याची व दुकानाच्या बेसमेंटचा वापर करण्याचीहि परवानगी दिली. आवाक्याबाहेरचा खर्च करून त्यानी छावा खुशाल विकत घेतला व त्याचे नाव ’ख्रिश्चन’ ठेवले. सिंहछावा संभाळायचा तर त्याला बागडण्यासाठी भरपूर मोकळी जागा हवी, तोहि प्रश्न एका धर्मगुरूने सोडवला. त्याच्या चर्चच्या मोकळ्या पण बन्दिस्त आवारात ख्रिश्चनला मोकळे सोडून त्याचे बरोबर हे दोघे खेळत! दुकानात तो सर्वत्र मोकळेपणाने वावरत असे. गिर्‍हाइकेंही त्याची भीति न बाळगतां त्याच्याशी खेळत. त्याला संभाळण्याचा खर्च त्याना डोईजड होत होता. तो लहान होता तोंवर हे सर्व चालले होते. या काही महिन्यांच्या काळाचे अतिशय मनोरंजक वर्णन पुस्तकांत वाचावयास मिळते. या दोघाना दिसत होते कीं हे काही खरे नाही. ख्रिश्चन भराभर मोठा होत होता. त्याचे बळ वाढत होते. त्याचेबरोबर खेळताना त्याना जाणवत होते कीं आता याला आवरणे कठीण होत जाणार आहे. मात्र त्यांना ख्रिश्चनचा व त्याला त्यांचा फार लळा लागला होता. ख्रिश्चनने लंडनमध्ये इतरहि अनेक लहान-मोठे मित्र-मैत्रिणी मिळवले होते! पण पुढे याचे काय करावयाचे? एकतर झू किंवा एखादी सर्कस हे त्याचे भवितव्य त्याना दिसत होते. पण झू मधील लहानशा आवारातील कायमचे बंदिस्त आयुष्य किंवा सर्कशीतील छळ-शिस्त व पिंजरा ख्रिश्चनच्या वाट्याला येऊं नये असे त्याना वाटे. पण सिंह शौक म्हणून संभाळणारा मालक कोण मिळणार हेहि कळत नव्हते.
त्या प्रश्नाचे अनपेक्षित असे उत्तर पुढे आले. Born Free या नावाचा एक सिनेमा खूप गाजला होता. मानवसमाजात जन्मलेल्या व वाढलेल्या एका सिंहिणीची ती कहाणी होती. त्या सिंहिणीला पुन्हा मुक्त नैसर्गिक जीवन कसे मिळवून दिले गेले हा त्या सिनेमाचा विषय होता. जॉय आणि जॉर्ज ऍडॅमसन या जोडीने त्या मानवसान्निद्ध्यांत जन्मलेल्या व वाढलेल्या सिंहिणीला निसर्गात मोकळे सोडण्याचा प्रयोग यशस्वी केला होता. त्याचीच कथा Born Free या जॉयच्या पुस्तकात व सिनेमात मांडलेली होती. सिनेमात जॉय आणि जॉर्जच्या भूमिका Bill Travers and Virginia Mckenna यांनी केल्या होत्या. त्या दोघांनी ख्रिश्चनला पाहिले व एस आणि जॉनची अडचण त्याना समजली. त्यानाहि मनापासून वाटले कीं ख्रिश्चनला झू किंवा सर्कशीत आयुष्य काढावे लागूं नये. त्यानी जॉर्ज ऍडॅमसन व एस/जॉन यांची ओळख करून दिली. जॉर्ज आतां असा एक मोठा प्रयोग करणार होता कीं मानवसमाजात जन्मलेल्या सिंहांचा एक जथाच केनियाच्या जंगलात नैसर्गिक मुक्त जीवन जगण्यासाठी सोडावयाचा. त्यांत ख्रिश्चनचाहि समावेश करण्याचे त्याने मान्य केले. एस आणि जॉन याना अत्यानंद झाला. हा प्रयोग पार पाडणे सोपे नव्हते. त्यातील अनेक अडचणी व केलेले अनेक प्रयोग यांची कहाणी अतिशय रोचक आणि मूळ पुस्तकांतूनच वाचण्यासारखी आहे. ख्रिश्चन एक वर्षाचा होईपर्यंत त्याचा प्रेमाने संभाळ करून अखेर त्याला केनियांतील जंगलात सोडण्यासाठी त्याचेबरोबर ते दोघे तेथे गेले व जड अंत:करणाने जॉर्ज ऍडॅमसनचा व ख्रिश्चनचा निरोप घेऊन परतले. एक वर्षभर ख्रिश्चनची हकिगत व प्रगति त्याना कळत होती. वर्षानंतर ते पुन्हा केनियाला ख्रिश्चनला पाहण्यासाठी गेले. ख्रिश्चन आता मुक्त होता व एक सिंहीण व काही छाव्यांच्या छोट्या कळपाचा प्रमुख बनला होप्ता. त्याची पूर्ण वाढ झाली होती. त्यांना सांगण्यात आले कीं ख्रिश्चन आतां तुम्हाला ओळखणार नाही. मात्र प्रत्यक्षात, जेव्हां उघड्या मैदानात ख्रिश्चन त्यांचेसमोर आला तेव्हां त्याने दोघांना लगेच ओळखले व अंगावर उड्या मारमारून व चेहेरे जिभेने चाटून त्यांचे प्रचंड स्वागत केले. आपल्या जोडीच्या सिंहिणीशीं त्यांची ओळखही करून दिली!
मूळ पुस्तक येथे संपले होते. कित्येक वर्षे गेलीं. २००८ सालीं ख्रिश्चन व एस/जॉन यांच्या अखेरच्या भेटीचे जे व्हिडिओ चित्रण केले गेले होते ते YOUTUBE वर कोणीतरी टाकले. ती व्हिडिओक्लिप अतिशय लोकप्रिय झाली व लाखों लोकांनी ती पाहिली. आजतागायत क्लिप बघणारांचा आकडा दररोज वाढतो आहे. व काही कोटींवर गेला आहे. हे क्लिप प्रकरण एस/जॉन जोडीला कळले व त्या निमित्ताने त्यानी पुस्तकाची नवीन आवृत्ति काढली तींत ख्रिश्चनबरोबरचे त्यांचे व इतर मित्रांचे अनेक फोटो व ख्रिश्चनच्या अखेरच्या भेटीचेहि फोटो दिले आहेत. पुस्तक वाचून झाल्यावर मीहि YOUTUBE वर ती व्हिडिओक्लिप मुद्दाम पाहिली व उतरून घेतली. ती लेखाचे शेवटी पहावयास मिळेल. त्यांत ख्रिश्चनचे लंडनमधील जीवन, मग केनियाकडे गमन व अखेरची भेट असे सर्व आहे. एका अनोख्या विषयावरील हे पुस्तक मला खूप आवडले. आपणही ते वाचावे अशी माझी शिफारस आहे.

Monday, June 8, 2009

माझा तात्कालिक पुत्र

मागील लेखामध्ये एका पुस्तकाचा इंग्रजीत परिचय लिहिला होता. त्याच विषयावर आज मराठीत पुन्हा लिहीत आहे. ’शब्दबंध’ कार्यक्रमामध्ये वाचण्यासाठी हा मराठी लेख तयार केला.
माझा तात्कालिक पुत्र
एका अनाथाची कहाणी
ले. तिमेरि मूर्ति
पेन्ग्वुइन बुक्स -२००५

एका अनाथ मुलाची ही एक अनोखी कहाणी आहे. भारतात अनाथ मुले ही काही नवलाईची गोष्ट नाही. या मुलाचे दुर्दैव व सुदैवहि एक प्रकारे अजबच म्हणावे लागेल. हे मूल जन्माला आले तेच अनेक व्याधि व व्यंगे घेऊन. त्याचे आईबाप अतिशय गरीब होते व अशा अपंग मुलाला संभाळणे त्याना अशक्य होते. जन्मल्यापासून काही थोड्या वेळानेच, त्यांनी त्याला रस्त्याच्या कडेला सोडून दिले होते. तीं कोण होतीं हें कधीच उघड झाले नाही. ही घटना चेन्नइ मधील असल्यामुळे, ते मूल रस्त्यावरून उचलले जाऊन अखेर चेन्नैमधील एका अनाथाश्रमात येऊन पोचले. त्या मुलाला उपजत इतकी व्यंगे होतीं की ते अल्पकाळाचेच आयुष्य भोगणार असेच कोणीहि म्हटले असते. त्याचा शरीराचा छातीच्या खालचा भाग नीट बनलेलाच नव्हता. त्याची मूत्र पिशवी शरीराबाहेरच होती. त्याचा लिंगभागही व्यवस्थित बनलेला नव्हता. ते जेमतेम जिवंत होते व अखंड वेदना भोगत होते. येवढ्या लहान वयातहि, वेदना असह्य झाल्यामुळे ते आपले डोके पाळण्याच्या कडेवर आपटत राही.
ही कथा त्या बालकाची आहे तशीच या लेखकाचीहि आहे. हा लेखक भारतीय आहे. तो पत्रकार, इंग्रजीमध्ये लेखन करणारा, कथा – कादंबर्‍या, सिनेमा कथा, नाटके व इतर अ-ललित लेखन करणारा आहे. त्याचे एकहि पुस्तक माझ्या वाचनात आलेले नव्हते. ही कथा त्या बालकाने लेखकाच्या घरात काढलेल्या एक वर्षाच्या काळाची आहे. कथा अतिशय चटका लावणारी आहे व पुस्तक खालीं ठेववत नाहीं.
हे मूल खरे तर त्या अनाथाश्रमात अल्प काळाने मरूनच जावयाचे. पण घोर दुर्दैवाबरोबर ते कोठेतरी मोठे सुदैवहि घेऊन जन्मले होते. लेखकाची पत्नी, मूळची ऑस्ट्रेलियन, आणि समाजकार्य करणारी. चेन्नईतील इतर राष्ट्रांच्या कॉन्सुलेट्मध्ये काम करणारे अभारतीय, त्यांच्या बायका, इतर देशी-विदेशी समाजकार्यकर्ते अशांचा मोठा गोतावळा तिच्या बरोबर होता. या बाईंचे नाव मॉरीन. त्या अनाथाश्रमाला त्या वेळोवेळी भेट देत असत. अशाच एका भेटीच्या वेळी हे दुर्दैवी मूल तिच्या नजरेला आले. तिने त्याच्या समस्यांमध्ये लक्ष घालण्याचे ठरवले. अनाथाश्रमाचे काम पाहणार्‍या डॉक्टरने याच्या बाबतीत हात झटकले होते. मॉरीनने मुलाला उचलून एका सर्जनकडे नेले. त्याने तपासल्यावर फारशी आशा दाखवली नाही. थोडीफार रिपेअर सर्जरी करता येईल पण मूल नॉर्मल होणार नाही आणि जगण्याची आशा फारशी नाही असे त्याचे मत पडले. मॉरीन सहज हार मानणारी नव्हती. चेन्नईमधील प्रख्यात डॉ. श्रीपति यांना भेटण्याचे तिने ठरवले. भेटीची वेळ मिळवण्यापासून तिला आपल्या ओळखी वापराव्या लागल्या. मात्र डॉ. श्रीपतिनी आशा दाखवली. पुष्कळ सर्जरी करावी लागेल पण मूल बरेचसे नॉर्मल होईल. मात्र काही वर्षांनी प्लॅस्टिक सर्जरी करून त्याच्या लिंगात सुधारणा करावी लागेल असे म्हटले. (एव्हाना तपासण्यांवरून तो मुलगा असल्याचे निष्पन्न झाले होते.) खर्च अर्थातच खूप मोठा होता पण आपल्या मित्रपरिवाराच्या मदतीने तो प्रश्न सोडवता येईल ही तिला खात्री होती. पण सर्जरीपूर्वी व नंतरही मुलाला दीर्घकाळ माया व सेवा यांची खरी गरज होती. अनाथालयातून ती कशी भागणार हा खरा प्रष्न होता. या वेळपर्यंत लेखकाने या मुलाच्या समस्यांमध्ये मुळीच लक्ष घातले नव्हते. मात्र दुरून तो पत्नीची धडपड पहात होता. सर्जिकल काम डॉ. श्रीपति यांनी सर्व कौशल्य वापरून पुरे केले. त्यानंतर इलाजच न उरल्यामुळे मॉरीन त्या मुलाला सरळ आपल्या घरी घेऊन आली! एव्हाना मुलाचे नाव भीम पडले होते.
हे पुस्तक एक सत्य कथा आहे. भीम घरी आल्यावर लेखक त्याच्यांत कसा गुंतत गेला याचे अतिशय हृद्य वर्णन पुस्तकात सविस्तर वाचावयास मिळते. भीम घरी आल्यावर पहिल्याच रात्रीं तो लेखक व त्याची पत्नी या दोघांच्या मध्ये झोपला होता पण अविरत रडत होता. अखेर दमल्यामुळे थांबला. मग त्याचा हात लेखकाच्या हातावर पडला. कोणाही व्यक्तीचा स्पर्श म्हणजे वेदना असे भीमाच्या मनात घट्ट समीकरण बनले होते. पण लेखकाचा हा पहिला स्पर्श त्याला, कां कोण जाणे, पण आश्वासक वाटला आणि तेव्हांपासून दोघांमध्ये नवेच नाते जुळूं लागले. यापुढील काळातील भीमाची वाढ, प्रकृतीत सुधारणा, प्रगतीचे टप्पे, त्याची दिसून येणारी हुषारी, लेखकाचे त्याच्यात अधिकाधिक गुंतत जाणे याचे सविस्तर वर्णन पुस्तकांत वाचावयास मिळते. हा प्रवास सोपा मुळीच नव्हता. भीम फार रडका होता, त्यांतहि तो रात्रीं फार रडे. सांभाळण्यास ठेवलेल्या मुलीचा नाइलाज झाला कीं तिला भीमाला लेखक व मॉरीन यांच्याच स्वाधीन करावें लागे. प्रथमचा अलिप्तपणा केव्हांच जाऊन लेखक भीमाला आपलेंच मूल मानण्यापर्यंत केव्हां पोंचला हे त्यालाच कळले नाही. भीम थोडे बोलू लागला ते अर्थात इंग्लिश शब्द व सांभाळणार्‍या मुलीमुळे तामिळ शब्द. लेखकाचे मोठे घर, बाग यांत त्याचा संचार चाले. औषधे, उपचार हे चालूच होते व खर्चहि खूप होत होता पण लेखकाला त्याचा भार सोसतां येत होता.
लेखकाच्या पत्नीचा प्रथमपासून प्रयत्न होता कीं भीमाला कोणीतरी दत्तक घ्यावें. तिच्या मैत्रिणींनीहि या दिशेने प्रयत्न सुरू ठेवले होते. हें अर्थातच सोपे नव्हते. भीम हा एक अपंग बालक म्हणून जन्माला आला होता. त्याला आयुष्यभर औषधोपचारांची, शस्त्रक्रियांची गरज पडणार होती. दत्तक घेणार्‍याला हें सर्व परवडणे आवश्यक होतें. भीम हा अनाथ असल्यामुळे त्याला दत्तक घेण्याची सरकारी परवानगी मिळवणे हेहि सरकारी नियमांच्या कडक बंधनांमुळे कसोटी पाहणारें होतें. त्या सर्व खटपटीचे लेखकाने खुलासेवार वर्णन केले आहे. लेखकाचे मन भीमामध्ये दिवसेंदिवस इतके गुंतत गेले कीं आपणच भीमाला कां दत्तक घेऊं नये असे त्याला वाटे. पण स्वत:चे साठीचे वय विचारांत घेतले की त्याला जाणवे कीं पुढे त्याच्या उमेदीच्या वयांत आपण त्याच्यावर भारच टाकणार. तेव्हां आपण मन मारले पहिजे. सरकारी नियमांप्रमाण येवढ्या वयाच्या व्यक्तीला असे अनाथ मूल दत्तक घेतां येत नाहीं हीहि अडचण होतीच. त्याच्या जिवाची होणारी ओढाताण व तगमग त्याने सुरेख वर्णन केली आहे.
अखेर एका डच तरुण कुटुंबाने भीमाला दत्तक घ्यायचे असे ठरले. परवानग्यांचे सर्व सोपस्कार लेखक व मॉरीन यांनी व मॉरीनच्या मैत्रिणीने पुरे केले आणि ते जोडपे भीमाला भेटण्यासाठी व नेण्यासाठी चेन्नाईला आलें. त्यांना भीमाचा सहवास मिळावा म्हणून लेखकाने त्यांना आपल्या घरीच आणले. भीमालाही त्यांच्याशी जुळवून घेणे सोपे नव्हते. भीम आपल्याजवळून जाणार हे माहीत असूनहि स्वीकारणे लेखक व मॉरीन दोघांनाहि आणि भीमालाहि अतिशय अवघड होते. पण इलाज नव्हता.
पुस्तकाच्य़ा अखेरच्या भागात, भीम परदेशीं गेल्यानंतर काही काळाने लेखक इंग्लंडला गेला असताना तेथून भीमच्या दत्तक घरी गेला व तेथे त्याच्या आईवडिलांच्या, आजी-आजोबांच्या व त्यांच्या इतर अनेक नातेवाइक, मित्रमैत्रिणींच्या प्रेमाच्या सावलीत तो सुखाने वाढतो आहे, इंग्रजी विसरला आहे, पण तरीहि आपल्याला व मॉरीनला तो विसरलेला नाही हे पाहून समाधानाने परत आला असे वर्णन वाचावयास मिळते.
एखादे पुस्तक खालीं ठेववत नाहीं असा आपणा सर्वांना अनुभव येतो. मला या पुस्तकाचा असाच अनुभव आला.

Monday, February 16, 2009

माय टेंपररी सन

हे पुस्तक इंग्रजी भाषेत आहे व हा लेखहि मी प्रथम इंग्रजीतच तयार केलेला होता. पुन्हा मराठीत लिहिण्याचा आळस करून तो तसच येथे देत आहे. क्षमस्व!
My Temporary Son
-an orphan’s journey.
Timery N. Murary
Published 2005-Penguin Books

This book tells the story of a boy child, born badly deformed and abandoned by its parents immediately after its birth and when found, sent to an orphanage in Chennai. The author is an Indian, Journalist and author of Novels in English, non-fiction, screen plays and stage plays. I had not read any of his books so far. This book, besides being the story of the child, is also the story of the author himself and the year the child spent in his home before it was adopted by a Danish family and eventually taken by them to their country. It is a very poignant story and the book is un-put-downable.
The child was horribly deformed at birth. His bladder was outside his body. He had no clearly formed sexual organs. The lower half of his abdomen was a mess. In the orphanage it continuously suffered acute pains and used to bang his head on the crib bars. It would have died early. The author’s wife, an Australian, was a social worker and had a large network of friends, wives of other Consulate staff of various countries in Chennai and NGOs. On one of her visits to the orphanage she noticed this child and took up his case. She took him up to a surgeon who said he could do repair surgery but the child would not become normal and the prognosis was very poor. Maureen, the lady, was not easily defeated. She took the child to another eminent surgeon in Chennai. Dr. Shripati said, he could do a lot of surgery and the child would become nearly normal but would need plastic surgery after some years to improve the size and shape of his penis. (The child was tested and found to be a boy.) The question of huge expenses was tackled by Maureen with the help of her network of friends and foreign aid NGOs. Still before and after the surgery the child was going to need continued love and care which obviously would not be available in the orphanage. The extensive surgery was done by Dr. Shripati and having no alternative, Maureen decided to bring the child, named Bhima, to her home. The author who was not directly involved in the affairs of Bhima was very much involved now.
After the child landed in the house of the Author, the book describes, in great detail, the continued involvement of the Author in the problems of Bhima. This is a true story and the progressive involvement of the Author in Bhima getting slowly better, growing and passing through various stages of his development into a happy, loving and intelligent child who gets deeply attached to the Author and Maureen is described in great detail on a day-to-day basis and reads better than a Novel. Starting from distance and aloofness the author gets completely attached to the child and starts feeling for him as his own child.
Efforts were on, from the beginning to find persons to adopt the child, who must provide all the special medical needs and loving care. The idea was to find a foreign couple to adopt Bhima . It was not easy and the book describes in detail the sustained efforts of Maureen, social workers and adoption agencies for locating such a family and to obtain all necessary permissions. That was a lengthy process and the author also has to get involved deeply, with his wife. The author had got so much attached to Bhima that he himself wanted to adopt him. But his age was 60 and that makes him question himself whether it would be correct to do so. His sense of helplessness and loss makes heartrending reading. A Danish couple was finally found suitable and they made a visit to India. The last part of the book deals with the visit, and the arrangements for sending Bhima away with them and describes the sense of utter loss and shock of the author and his wife and the pains suffered by Bhima also. The book ends on a happier note when the author visits Denmark and finds Bhima had ended up in the house of loving, young parents with a big network of friends and family who all had taken to Bhima and he had also settled down in his new home.
A wonderful book indeed!

Thursday, June 5, 2008

पॅशन इंडिया - अनिता डेलगाडोची कहाणी

हल्लीच वाचलेल्या एका पुस्तकाचा आज परिचय करून देणार आहे. जॅवियेर मोरो हे लेखकाचे नाव. महाराजा ऑफ कपुर्थळा आणि एक स्पॅनिश तरुणी यांची कहाणी या पुस्तकात वर्णिली आहे. पहिल्या महायुद्धाच्या पूर्वीचा काळ ही त्या कथेची सुरवातीची पार्श्वभूमि आहे. पुस्तकाचे प्रकाशन वर्ष माझेपाशी लिहिलेले नाही पण पुस्तक फार जुने नसावे. पुस्तक फार उच्च दर्जाचे नाही. पुस्तकात जागजागी भारतातील स्वातंत्र्यचळवळीचे व पुढार्‍यांचे आलेले उल्लेख अचूक वाटले नाहीत. संस्थानी वातावरणाची वर्णने करमणूक करतात. त्यात अतिशयोक्तिहि पुष्कळ आहे.
कपुर्थळाचा हा राजा त्याच्या बालवयात सत्तेवर आला कारण त्याचा पिता वारला. त्याचे शिक्षण बर्‍यापैकी झाले. त्याला इंग्लिश व फ्रेन्च उत्तम येत होते. तो फारसा जुनाट विचारसरणीचा नव्हता पण अखेर एक संस्थानिक होता! त्याचे राज्य व घराणे मात्र जुन्या वळणाचे होते. कपुर्थळा हे पंजाबमधील संस्थान आकाराने लहानसेच होते त्यामुळे फार श्रीमंत नव्हते मात्र, राजाच्या वैयक्तिक मालकीची खूप जमीन पूर्व उत्तर-प्रदेशात होती. १८५७च्या युद्धात त्यावेळच्या कपुर्थळा संस्थानिकाने ब्रिटिशाना मदत केल्यामुळे सरकारने ही जमीन त्याला भेट दिली होती. तिच्या उत्पन्नामुळे स्व्त: राजा मात्र खूप धनवान होता! राजाचे तीन विवाह झालेले होते व त्याला तीन पुत्र होते. इतर राणीवसा मोठा होता.
राजा युरोपच्या सफरीवर असताना फ्रान्समध्ये त्याचा अनिता डेल्गाडो या एका स्पॅनिश तरुणीशी परिचय झाला. ती एक गरीब पण बर्‍या घराण्यातील अशिक्षित मुलगी होती. तिला स्पॅनिशही जेमतेम लिहिता वाचता येत होते. ती थोडेफार नृत्य शिकली होती एवढेच! दोघी बहिणी हॉटेलान नाचून संसार चालवण्यास वडिलाना मदत करत होत्या. हॉटेलात बहिणीबरोबर नाचताना ती राजाला दिसली व तो तिच्यासाठी पागलच झाला. हरप्रयत्नाने तिच्या वारंवार भेटी घेऊन व ’भेटी’ देऊन तिला वश करण्याचा त्याने प्रयत्न चालवला. दोघांच्या वयामध्ये खूप फरक होता. त्याने अनिताला अखेर मागणीच घातली! मात्र तिच्या आईवडिलांनी स्पष्ट अट घातली की राजाने स्पॅनिश कायद्यानुसार तिच्याशी लग्न (सिव्हिल मॅरेज) केले पाहिजे. राजाने ते मान्य केले. ती अशिक्षित असल्यामुळे काही काळ तिला पॅरिसमध्ये ठेवून राजाने तिच्या शिक्षणाची व श्रीमंताचे रीतिरिवाजहि शिकवण्याची व्यवस्था केली. नंतर तिला कपुर्थळाला आणले. युरोप व कपुर्थळा यांच्यात महदंतर होते. तिला राजाच्या इतर राण्यांची व कुटुंबाचीहि कल्पना नव्हती. राजाने तिच्यासाठी स्वतंत्र निवासस्थान बांधले. हळूहळू तिला प्रमुख राणी मानले जाऊ लागले. मात्र ब्रिटिश व्हाइसराय व सरकार यांनी तिला कधीहि कपुर्थळाची राणी म्हणून मान्यता दिली नाही व राजाची इच्छा असूनहि त्याला त्याबाबत काही करता आले नाही. पुस्तकात तिच्या भारतातील वास्तव्याचे व तिच्या व्यक्तिमत्वात झालेल्या बदलाचे खुलासेवार दीर्घ वर्णन आहे. राजकुमारी अमृतकौर ही कपुर्थळाच्या राजघराण्याच्या एका ख्रिस्ती झालेल्या शाखेत जन्मलेली. तिची व अनिता डेल्गादो हिची घनिष्ट मैत्री होती.
दुसर्‍या महायुद्धातहि राजाने व संस्थानाने ब्रिटिशांना सर्व मदत केली. स्वातंत्र्य मिळाल्यावर संस्थान विलीन होण्याला अर्थातच काही पर्याय नव्हताच.
राजा वयाने मोठा तेव्हा कालांतराने त्याचे अनिताकडून लक्ष उडाले. अखेर तो महाराजा! त्याचा एक पुत्र अनिताचा समवयस्क होता. अनिताचे व त्याचे प्रेमसंबंध जुळले व ते राजाच्या ध्यानी आल्यावर त्याने अनिताला सरळ घटस्फोट दिला व स्पेनला परत जाणे भाग पाडले. तिला पैसे, दागदागिने, वेळोवेळी मिळालेल्या भारी भेटवस्तू नेऊ दिल्या. भरपूर पेन्शनही दिली. मात्र भारतात परत यावयाचे नाही अशी स्पष्ट अट घातलेली होती. सरकारनेही तिला त्यानंतर भारतात येऊ दिले नाही. तरीहि राजा युरोपात गेला तर तिला भेटत असे व त्यांची मैत्री राजाच्या मृत्यूपर्यंत कायम राहिली. तिच्या आईवडिलांच्या मृत्यूच्या वेळी पहिला शोकसंदेश त्याचेकडूनच पाठवला गेला. एका अशिक्षित मुलीने नशिबाने मिळालेले राणीपद व वैभव दीर्घकाळ उपभोगले होते व स्वत:ची वैयक्तिक उन्नति साधली होती.
राजाने खरेतर अनिताच्या आईला आपल्या तीन राण्यांच्या संसाराची पूर्ण माहिती दिली होती व अनिताला सांगावयास सांगितले होते. पण गरिबीमुळे राजाने देऊ केलेल्या संपत्तीला भुलून तिने अनिताला अंधारात ठेवले होते. ही गोष्ट कालांतरानेच अनिताला कळली पण तेव्हा वेळ निघून गेली होती.

Saturday, May 31, 2008

जोन्सटाउनचा पूर - भाग २

पुस्तकातील पहिल्या दोन पानांचे फोटो पहिल्या भागात दिले होते. लेखाचा उरलेला भाग आता वाचावयास मिळेल. पहिल्या भागातील दुसरे पान पुन्हा वाचा म्हणजे तिसर्‍या पानाची नीट संगति लागेल. घटना व त्यावरील पुस्तक दोन्हीहि जुनी आहेत व मी वाचल्यालाहि बराच काळ लोटला. मात्र त्यातील मनुष्यस्वभावाचे दर्शन अजूनहि ताजेच म्हणावे लागेल. या कारणास्तव या जुन्या विषयावर लिहिले.Friday, May 30, 2008

जोन्सटाउनचा पूर


आज माझ्या एका पुस्तकातील आणखी एका लेखाची पहिली दोन पाने प्रसिद्ध करीत आहे. या विषयावर आमच्या ज्येष्ठ नागरिक संघटनेत मी एक व्याख्यानहि दिले होते. (इतर कोणी बोलावल्यास पुन्हाहि देण्याची तयारी आहे!) लेखात प्रथमच म्हटल्याप्रमाणे पुस्तक वाचताना पानशेतच्या प्रलयाची आठवण येत होती.
उरलेली पाने भाग दोन मध्ये वाचावयास मिळतील.

www.Blogwani.com
Locations of visitors to this page