Sunday, May 11, 2008

भारताचा थोर गणिती - श्रीनिवास रामानुजम - भाग २

रामानुजम हा कुंभकोणम शहरातील एका गरीब वैष्णव अय्यंगार ब्राह्मण कुळातला पहिला मुलगा. पाठची काही भावंडे अल्प वयात वारली. दोन भाऊ जगले ते त्याच्यापेक्षा खूप लहान. बालवयात देवी आल्या व चेहेऱ्यावर खुणा ठेवून गेल्या. शरीरप्रकृति साधारण, खेळांमध्ये रुचि नाही. अभ्यासातील हुशारी मात्र बालवयातच दिसून येई. अंकगणितात आपल्यापेक्षा कोणाला जास्त मार्क मिळाले तर त्याला राग येई! इतर विद्यार्थ्याना शिकवणे त्याला आवडे. शालेय शिक्षण संपेपर्यंत त्याची प्रगति उत्तमच होती व त्यामुळे त्याला कॉलेज शिक्षणासाठी शिष्यवृत्ति मिळाली. त्याच्या स्वत:च्या किंवा मातुल कुळात उच्च बौद्धिक कामगिरीची कोणतीहि परंपरा नव्हती. ब्राह्मणकुळात जन्म एवढाच वारसा होता. वडील नगण्य व घरात आईचा वरचष्मा होता. घरातील वातावरण सर्व आचारधर्म निष्ठेने पाळणारे होते व त्याचीहि मनोवृत्ति तशीच होती. शाळकरी वयापासून त्याचे गणिताचे आकलन व आकर्षण असामान्य होते. त्याच्या घरात भाडेकरू असलेल्या काही कॉलेज विद्यार्थ्यानी जी. एस. कार नावाच्या लेखकाच्या एका गणिताच्या पुस्तकाशी त्याचा परिचय करून दिला. त्याच्या वयाच्या मानाने ते फारच पुढचे होते. त्याचा रामानुजमच्या आयुष्यावर फार परिणाम झाला. ५००० निरनिराळी प्रमेये, फॉर्म्युले, इक्वेशन्स यांचा हा हा एक संग्रह होता. आल्जिब्रा, जॉमेट्री, ट्रिगॉनॉमेट्री, डिफरन्शिअल इक्वेशन्स अशा अनेक विषयांचा त्यांत समावेश होता. फॉर्म्युले दिले होते पण त्यांच्या सिद्धता दिलेल्या नव्हत्या. हे पुस्तक काही विशिष्ट हेतूने बनवलेले होते. केंब्रिज विद्यापीठाची गणित विषयाची ट्रायपॉस ही परीक्षा तेव्हां फार गाजलेली होती. केंब्रिजचे हुशार विद्यार्थी या परीक्षेला बसत. प्रथम वर्गात पास होणाराना रॅंग्लर ही पदवी मिळे. प्रथम क्रमांकाला सीनियर रॅंग्लर म्हणत. कित्येक भारतीय या परीक्षेला बसत. महाराष्ट्रातील महाजनी व परांजपे ही नावे आठवतील. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक होते. परीक्षा पास होणारा विद्यार्थी विषेश बुद्धिमान समजला जाई व पुढील आयुष्यात हमखास चमकत असे मात्र तो असामान्य गणिती वा गणितसंशोधक हॊईलच असे नसे! उलट, कित्येक असामान्य गणितज्ञाना ही परीक्षा जड जाई!
शाळकरी वयापासून या पुस्तकाने व गणित या एकाच विषयाने रामानुजमला झपाटून ताकलेले होते. कॉलेजमध्ये गेल्यावर इतर कोणत्याच विषयात त्याला रस वाटेना. परिणामी शिष्यवृत्ति मिळवणारा हा विद्यार्थी कॉलेजात चक्क नापास होऊ लागला. इंग्लिश बऱ्यापैकी येत असूनहि त्याही विषयात नापास! एक दोन वर्षे असे चालून अखेर शिष्यवृति बंद झाली व गरिबीमुळे कॉलेज सोडून घरी बसावे लागले. शिक्षण संपले पण गणिताचा अभ्यास चालूच होता. नोकरी शोधावी तर शिक्षण अर्धवट त्यामुळे काही जमेना. किरकोळ कामे करणे व गणित शिकवणे यावर कसेबसे चालले होते. गणित शिकवणेहि साधारन विद्यार्थ्याच्या डोक्यावरून जाणारे. गणितातला तज्ञ अशी त्याची कीर्ति झाली होती व त्या विषयात रस असलेल्या अनेकांशी मैत्री झाली होती. गणिताचा अभ्यास जोरात चालू होता व नवनवीन मूलगामी तत्वे, फॉर्म्युले, प्रमेये त्याला सुचत होती व स्फुरत होतीं. त्याच्या वह्या भरून जात होत्या. मात्र कोणत्याही प्रमेयाची सिद्धता तो पायरीपायरीने लिहीत नव्हता, ते बरोबर आहेच असा त्याचा ठाम विश्वास असे! त्याला कोणी डिग्री देणार नव्हते याची त्याला पर्वा नव्हती पण आपले काम कोणातरी विद्वानाने पहावे, चर्चा करता यावी यासाठी तो आसुसला होता. भारतात हे कसे जमावे हे कळत नव्हते. पोटाचा प्रष्न होताच. प्रथेप्रमाणे बालवयातच लग्न झालेले होते. पत्नी खूप लहान व अजून माहेरीच होती. मित्रांच्या मध्यस्थीने त्याचे काही संशोधन भारतीय गणित संस्थेच्या प्रकाशनात छापले गेले होते एवढेच! रामचंद्रराव नावाच्या एका मित्राने एक वर्ष त्याचा खर्च चालवला. अखेर त्याची लायकी ओळखणाऱ्या कही वजनदार मित्रांच्या मध्यस्थीने त्याला मद्रास पोर्ट ट्रस्ट मध्ये कनिष्ठ कारकुनाची नोकरी लागली व पोटाचा प्रष्ण काहीसा सुटला. मोकळा वेळहि मिळू लागला कारण त्याने झटून काम करावे अशी कोणाची अपेक्षा नव्हतीच. नोकरी मिळाल्यावर पत्नी घरी आली व संसार कसाबसा सुरू झाला. सासूसुनेचे पटत नव्हते व सासू सुनेचा प्रथेप्रमाणे छळ करत होती. शिक्षण अर्धवट राहिल्यामुळे कार च्या जुन्या झालेल्या पुस्तकाच्या नंतरच्या गणित विषयातील नवीन घडामोडी त्याला अज्ञात होत्या. मात्र त्याची प्रतिभा स्वयंभू होती व इतरांनी शोधलेली कित्येक प्रमेये त्याला स्वतंत्रपणे सुचली होती व त्याच्या वहीत सिद्धतेशिवाय लिहिलेली होती. पण एक प्रकारे त्याची प्रगति खुंटली होती व पुढचा मार्ग दिसत नव्हता. तो कसा खुला झाला हे पुढील भागात पाहूं.

2 comments:

xetropulsar said...

ह्म्म्म्. . . .माहिती बरोबरच त्यांच्या कार्याचे महत्व व आजवरच्या भारतीय गणितज्ञांत त्यांचे असणारे अढळ स्थान यावर देखील लिहावे असे वाटते. . .संख्याशास्त्रातील त्यांचे निवडक नियम, शोध यांची माहिती देखील द्यावी. . .

अशी माणसे 'घडत' नाहीत. . .ती जन्मजात तशीच असतात. . आपल्या शंभर कोटींच्या देशात खरंतर अशी माणसे इतर देशांपेक्षा जास्त संख्येने असायला हवीत. . .ज्याला ज्या विषयात गती आहे त्याला त्या विषयात काम करू द्यायला हवं. . .आपल्याकडे मात्र 'धोपटमार्गा सोडू नको' हेच आपलं जगण्याचं तत्व.

अमित

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

पुढील भागांमध्ये काही माहिती येईल. त्याचे गणितातील काम सर्वसामान्य वाचकाला कळण्यासारखे मुळीच नाही. मलाही फारसे कळलेले नाही.

www.Blogwani.com
Locations of visitors to this page