Saturday, April 12, 2008

अयोध्या विवाद

अयोध्या विवाद – लेखक श्री. शेखर सोनाळकर
बाबरी मशीद पाडली गेल्यानंतर हे पुस्तक प्रसिद्ध झाले. हा विषय तसा वादग्रस्त आहे. लेखकाने खूप मेहेनतीने अनेक पुस्तकांचा उत्खनन अहवालांचा ऐतिहासिक संदर्भांचा तपशीलवार अभ्यास केलेला दिसून येतो. पूर्वी अस्तित्वात असलेले राममंदिर उध्वस्त करून बाबराने ही मशीद बांधली होती काय याबद्दल लेखकाने मत दिले आहे की मशिदीच्या जागी आधी मंदिर असल्याचा पुरावा मिळालेला नाही. हे मत पटणे वा न पटणे व्यक्तिगत राहील. या जागी रामाचे जन्मस्थळ होते काय हा तर श्रद्धेचा भाग आहे. पण मंदिर पाडून मशीद बांधली गेली काय हा वस्तुनिष्ठ पुराव्यांचा विषय आहे. लेखकाने मांडलेले मुद्दे निकोप मनाने विचारात घेण्यास हरकत नसावी. या विचाराने पुस्तकातील काही माहिती आपणासमोर मांडली आहे.
१ रामायणाच्या उत्तरकांडातील एका उल्लेखाप्रमाणे अयोध्येपाशी शरयू नदी पश्चिमवाहिनी होती. प्रत्यक्षात ती तेथे उत्तरेला व मग वळण घेऊन पूर्वेला जाते. नेपाळातील शरयूचा काही भाग पश्चिमवाही आहे. मग रामायणकाळी अयोध्या नेपाळात होती काय?
२. बाबर प्रत्यक्षात अयोध्येपर्यंत आला होता काय याबद्दल शंकेला जागा आहे. बाबरनामा मुळात तुर्की भाषेत लिहिलेला होता. त्याच्या भाषांतरावरून इंग्रजीत भाषांतरे झाली. भारताच्या पूर्व भागात अफगाणांची सत्ता होती. त्याच्यावर बाबर चालून आला. या युद्धाच्या कालखंडातील बाबरनाम्यातील काही पाने गहाळ आहेत. मात्र एका इंग्रज महिलेने मूळ तुर्की ग्रंथ वाचून असे मत दिलेले आहे की बाबराचा तळ अयोध्येपासून ७०-८० मैलांवर ’अवध राज्याच्या सीमेवर’ पडला होता. अफगाणांशी युद्ध तेथेच झाले व पावसाळा आल्यामुळे बाबर तेथूनच आग्र्याला परत गेला. अयोध्येपर्यंत आलाच नाही.
२ मशिदीवरील ज्या शिलालेखांवरून बाबराने ही मशीद बांधली अशी समजूत होती ते शिलालेख खूप नंतरचे होते. त्यांच्यांत औरंबजेबाचा उल्लेख आहे व भाषा, वळण बाबरकालीन नाही.
४. बाबरी मशिदीचे बांधकाम ’जौनपूर’ पद्धतीचे आहे (होते). या प्रकारच्या अनेक मशिदी बाबरापूर्वी अफगाण अमलात त्या भागात बांधलेल्या होत्या. त्यातीलच ही एक.
५. मशिदीच्या भिंतीत काही दगडी खांब होते ते मुसलमानी वळणाचे नव्हते. पण ते फक्त सहा फूट उंच व भिंतीत नुसतेच बसवलेले होते.त्यांच्यावर भिंतीचे वा छ्ताचे वजन नव्हते. सहा फुटी खांब ’भव्य’ मंदिराचे अवशेष म्हणणे सयुक्तिक नाही.
६. मशिदीभोवती ब्रिटिश काळात भिंत बांधली गेली. तिच्या बाहेर एक चबुतरा रामजन्मस्थळ म्हणून मानला जात असे. हा श्रद्धेचा भाग खरा पण रामाचा जन्म अयोध्येत कौसल्येच्या म्हणून म्हटल्या जाणाऱ्या महालापासून खूप दूर या चबुतऱ्याच्या जागी कां झाला असेल?
हे काही मुद्दे वानगीदाखल दिले आहेत. उत्सुकता असणारानी मूळ पुस्तक वाचावे. बाबरी मशीद आता पाडली गेली आहे. त्या सर्व जागेचे ’पद्धतशीर’ उत्खनन कधी काळी झाले तर तेथे पूर्वी विक्रमादित्याने बांधलेले भव्य राममंदिर होते काय याचा उलगडा होऊ शकेल. मात्र कित्येक वर्षे हे होणे शक्य दिसत नाही. तेव्हा हा विषय संपलेला आहे.

4 comments:

Samved said...

फडणीस काका, नमस्कार. माझ्या ब्लॉगवरच्या तुमच्या comment बद्दल thanks. तुमच्या वेळीही हॉस्टेल लाईफ असंच होतं वाचून गंमत वाटली.
तुमचे ३-४ही ब्लॉग आणि त्यावरचे पोस्ट वाचले. मजा आली. तुम्ही computer सारखं नवं माध्यम इतक्या सहजतेने वापरता याचं खरंच कौतुक आणि नवल वाटलं.
तुमच्या सारया उपक्रमांसाठी माझ्या अने शुभेच्छा!
परत भेटुच

- संवेद

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

धन्यवाद. वाचकांच्या प्रतिक्रिया येत राहिल्या म्हणजे लेखनाला हुरूप येतो! तेव्हा प्रतिक्रिया देत रहा!

HAREKRISHNAJI said...

nothing new ?

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

दुसऱ्या ब्लॉगवर वेळ जात होता. लवकरच नवीन लेख येईल असे आश्वासन (पुढारी छाप नव्हे) देतो.

www.Blogwani.com
Locations of visitors to this page